महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकाला बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारावीच्या परीक्षा संपल्या असून, दहावीचे काही पेपर अद्याप बाकी आहेत.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. परीक्षांच्या त्वरित निकालासाठी उत्तरपत्रिका तपासणीला वेग दिला जात आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांकडून उत्तरपत्रिकांची दररोज समीक्षा केली जात आहे.
बारावीच्या आयटी विषयाचा पेपर आणि दहावीचे दोन पेपर बाकी असले तरी निकाल वेळेत जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. 17 मार्चला परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी अधिक जलदगतीने केली जाणार आहे. दररोज शाळेच्या वेळेत शिक्षकांना किमान 35 उत्तरपत्रिका तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विरारमध्ये एका शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या. दुर्दैवाने, घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 175 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. या विद्यार्थ्यांना अन्य विषयांच्या सरासरीवर गुण दिले जाणार आहेत. उत्तरपत्रिका घरी नेण्याच्या नियमभंगामुळे संबंधित शिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे.
शिक्षक संघटनांचा यंदा बहिष्कार नसल्याने दहावी आणि बारावीचे निकाल 15 मेपूर्वीच घोषित करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर सतत अपडेट तपासाव्यात.