महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अलीकडेच दहावी आणि बारावीच्या परीक्षे संदर्भात मोठा निर्णय घेतला होता. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी बोर्डाने परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आलाय. कॉपी आढळल्यास आता केंद्राची मान्यचा कायमची रद्द करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, म्हणून पर्यवेक्षक व केंद्र संचालकांची आदलाबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आला होता. पण, शिक्षक संघटनांसह शिक्षक आमदारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तो निर्णय बदलला आहे. आता कोरोना काळ वगळून 2018, 2019, 2020 व 2023 आणि 2024 या काळातील परीक्षेवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळली, त्या केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक मात्र बदलण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
सध्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सुरु आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. दुसरीकडे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात पार पडणार आहे.
दरम्यान, राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर आणि कोकण या विभागीय मंडळाअंतर्गत येणाऱ्या केंद्रांवर कोरोनाचे 2021 व 2022 ही दोन वर्षे वगळून 2018 पासून झालेल्या परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी प्रकरणे आढळली, त्या केंद्रांवर आता नवीन पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमले जाणार आहेत.