पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणूतील सुमारे सत्तर वर्षांचा इतिहास असलेल्या दी. डहाणूरोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. २६ एप्रिलला या बँकेसाठी मतदान होणार आहे; परंतु या बँकेतील सध्याचे सत्ताधारी आणि पूर्वीचे सत्ताधारी आता एकत्र आल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.
दी. डहाणूरोड जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. या बँकेच्या चार शाखा असून तिचे १५ हजार ६२९ सभासद आहेत. त्यापैकी सात हजार ५१५ सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. डहाणूच्या आर्थिक जडणघडणीत या बँकेचा मोठा वाटा आहे. ही बँक आतापर्यंत आनंदभाई ठाकूर, भरत राजपूत आणि मिहीर शहा या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या काळात कार्यरत होती. या बँकेवर २७ वर्ष भरत राजपूत यांच्या पॅनलचे वर्चस्व होते; परंतु गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांनी हे वर्चस्व मोडीत काढून प्रगती पॅनलच्या नेतृत्वाखाली बँकेची सत्ता आणली.
पूर्वी संघर्ष, आता एकत्र
डहाणूच्या आर्थिक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा वाटा असलेल्या या बँकेवर सत्ता कुणाची यासाठी पूर्वी संघर्ष होत होता; परंतु या वेळी मात्र सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन बँकेच्या कारभारात राजकारण नको आणि डहाणूच्या आर्थिक विकासात मोठा वाटा असलेल्या तसेच सामान्य सभासदांच्या विश्वास असलेल्या बँकेत चांगला कारभार करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. त्यांनी डहाणू विकास आघाडीची स्थापना केली आहे.
आर्थिक स्थिती
या बँकेचे भागभांडवल पाच कोटी ७७ लाख ९२ हजार आहे, तर ठेवी १५७ कोटी ४९ लाख एक हजार रुपयांच्या आहेत. बँकेने शंभर कोटी ३९ लाख तीस हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा एकूण कारभार २५७ कोटी ८८ लाख ३१ हजार आहे. बँकेने ७३ कोटी ७१ लाख १५ हजार रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. या बँकेला या वर्षात ‘बँक ऑफ ब्ल्यू रिबन अवार्ड’ मिळाले आहे. विशेष म्हणजे या बँकेतील सत्ताधाऱ्यांनी बँकेचे अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) शून्य ठेवण्यात यश मिळवले आहे.
त्रिकुटाचे उमेदवार
या बँकेच्या निवडणुकीत या वेळी डहाणू विकास आघाडी स्थापन केली आहे. ती स्थापन करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंदभाई ठाकूर, डहाणूचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांचा मोठा वाटा आहे. बँकेसाठी स्थापन झालेल्या डहाणू विकास आघाडीने १५ उमेदवार जाहीर केले असून, भरतसिंग राजपूत मिहीर शहा, भावेश देसाई, कुमार नागशेठ,वरूण पारेख, वैशाली बोथरा,उन्नती राऊत, शमी पीरा, जगदीश राजपूत,भरत शहा,रोहींटन झाईवाला, पंकज कोरे, रमेश काकड,पिनल शहा, मनोज धांगकर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
‘प्रगती’ची सत्ता
या बँकेवर पूर्वी २७ वर्षे जरी भरत राजपूत यांच्या पॅनेलची सत्ता असली, तरी २०१६ पासून मात्र प्रगती पॅनल पॅनेलने बँकेवर सत्ता गाजवली. मिहीर शहा हे बँकेचे अध्यक्ष होते. मागच्यावेळी संचालकांच्या १५ जागा प्रगती पॅनलने जिंकल्या होत्या. या वेळी दोन्ही गट डहाणूच्या विकासाचे स्वप्न घेऊन एकत्र आले आहेत. त्यांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. अशा पार्श्वभूमीवर आता बँक निवडणुकीला सामोरे जाते, की निवडणूक बिनविरोध होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता असून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले, तरी पूर्वीच्या सत्ताधारी आणि आत्ताच्या सत्ताधारी गटापुढे कोणाचीही जिंकून येण्याची क्षमता नसल्याने निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
दी ‘डहाणूरोड जनता को-ऑपरेटिव्ह बँक ही डहाणूच्या आर्थिक विकासाचा पाया आहे. या बँकेचे सभासदांशी विश्वासाचे नाते आहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासाला तडा न जाता अधिक चांगले काम करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. बँकेचा एनपीए शून्य असून बँक अधिक प्रगती करेल, असा विश्वास आहे.
आनंदभाई ठाकूर, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजीत पवार गट