पालघर-योगेश चांदेकर
पालघरः खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. पालघर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करीत असताना त्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी भिवंडी-वाडा रस्त्यावरून थेट प्रवेशद्वार करण्याची मागणी केली तसेच या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत खा. सवरा यांनी गडकरी यांच्यांअशी सविस्तर चर्चा केली.
भिवंडी-वाडा हा राष्ट्रीय महामार्ग असून तो औद्योगिक, व्यापारी आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग जात असून या मार्गावर जाण्यासाठी भिवंडी-वाडा राष्ट्रीय महामार्गावरून थेट प्रवेश उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. ही बाब खा. सवरा यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणली.
इंधन, वेळेचा अपव्यय
भिवंडी-वाडा राष्टड्रीय महामार्गाच्या आठ किलोमीटर अंतरावरून दिल्ली-मुंबई द्रुतगती रस्ता जात आहे. या रस्त्याला थेट प्रवेशद्वार नसल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिकांना दूरवरून फेरी मारून पर्यायी मार्ग वापरावा लागतो आहे. त्यामुळे इंधन आणि वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाला भिवंडी-वाडा या राष्ट्रीय महामार्गावरून थेट जोडणी नसल्याने भिवंडी शहरात कायम वाहतूक कोंडी असते. त्यामुळे नागरिकांचा श्वास गुदमरतो; शिवाय प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाढतो.
कंपन्या स्थलांतरित होण्याची भीती
सध्या वाडा आणि भिवंडी या परिसरात औद्योगिक प्रकल्प आहेत; परंतु या प्रकल्पातून भिवंडी-वाडा राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाला जाण्यासाठी थेट प्रवेशद्वार नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. कंपन्यांची वाहने वाहतूक कोंडीत अडकत असल्याने या भागातून कंपन्या अन्यत्र स्थलांतरित होऊ शकतात, असे खा. सवरा यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणले. थेट जोडणी नसल्याने शेतकऱ्यांनाही दूरवरून शेतीमाल गुजरातच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने न्यावा लागतो तसेच मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावरून भिवंडी-वाडा राष्ट्रीय महामार्गाला येता येत नसल्याने या द्रुतगती मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांनाही दूरवरून फेरी मारून यावे लागते.
खा. सवरा यांनी सुचवले पर्याय
या समस्येवर मार्ग काढण्याची मागणी खा. सवरा यांनी करताना त्यांनी गडकरी यांना काही पर्यायही सुचवले. भिवंडी-वाडा राष्ट्रीय मार्गावर लामज गावाजवळून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर थेट प्रवेश उपलब्ध करून द्यावा. रस्ता दुरुस्ती. रुंदीकरण आणि नवीन एंटरचेंज बांधावे. असे केल्यास वाहतूक वेगात होऊ शकेल आणि या भागातील लोकांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.
रोजगार वृद्धी होईल
व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार असून त्यामुळे या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबुती येईल. या भागात नवे उद्योग येऊन त्याचा परिणाम रोजगार वाढीवर होईल. या परिसरातील पाच हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शेतीमालाची जलद वाहतूक होऊन शेतकऱ्यांना नाशवंत माल कमी काळात बाजारपेठेत पोहोचवता येईल. दिल्ली-मुंबई द्रुतगती रस्ता हा देशाच्या दळणवळण आणि औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. भिवंडी-वाडा राष्ट्रीय महामार्गावर या द्रुतगती मार्गावरून थेट प्रवेशद्वार निर्माण झाल्यास या परिसराचा विकास होईल आणि स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी गडकरी यांच्यांशी चर्चा करताना सांगितले.
कोट
‘मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग आणि वाडा-भिवंडी राष्ट्रीय महामार्ग हे परस्परांना जोडण्याबाबत केंद्रीय रस्ते बांधणी आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल.
– डॉ हेमंत सवरा, खासदार, पालघर लोकसभा मतदारसंघ