पालघर-योगेश चांदेकर
पालघरः केळवा-माहीमसह १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कंट्रोल पॅनलचे स्टार्टर न बसवताच बील काढण्यात आले. याबाबतचा चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल चौकशी अधिकारी एम. ए. ठाकरे सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांना देणार आहेत.
दरम्यान, या योजनेत गैरप्रकार झाले असून २०२१ नंतर कंट्रोल पॅनलची दुरुस्ती न होताच बिले काढल्याचा प्रथम दर्शनी ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेचे कंट्रोल पॅनल २०२१ मध्ये वसईतून आणण्यात आले होते. पालवे यांनी याप्रकरणी ठाकरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांनी प्रत्यक्षात केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेची जागेवर जाऊन पाहणी केली. तेथील कागदपत्रे तपासली.
बील काढल्याबाबत ठेकेदारच अनभिज्ञ
ज्या ठेकेदार कंपनीला हे काम देण्यात आले होते, त्याला आपल्या नावावर असे काही बील निघाले असल्याची माहिती नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तत्कालीन अभियंता प्रशांत इंगळे यांनी गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश वर्मा यांचे जाबजबाब ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या माहितीची नोंद ठाकरे यांनी घेतली. त्यानुसार २०२१ नंतर केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेचे कंट्रोल पॅनल बदललेले नाहीत, हे स्पष्ट झाले.
चौकशी अधिकाऱ्यासमोरच पंप परत
या योजनेचे पंप इंगळे यांच्या मार्फत दुरुस्तीला पाठवले होते; परंतु त्याचीही नोंद करण्यात आली नव्हती. हे पंप चौकशी अधिकारी ठाकरे केळवा-माहीममध्ये असतानाच तिथे आले. त्याची नोंद ठाकरे यांनी त्यांच्या चौकशी अहवालात घेतली असल्याचे समजते. केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेचे कंट्रोल पॅनल, स्टार्टर कधी बसवले, त्याची बिले आणि कागदपत्रे ठाकरे यांनी तपासली आहेतका. त्याचप्रमाणे या योजनेच्या नोंदवहीतही मे २०२३ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत किती पंप दुरुस्तीला पाठवले, दुरुस्त झालेल्यापैकी किती आले, यावर या अहवालात नोंद घेणे अपेक्षित आहे. मे २०२३ ते ऑगस्ट २०२३ यादरम्यान जिल्हा परिषदेमार्फत पंपाच्या दुरुस्तीचे बील देण्यात आले का, याबाबतचा अहवाल आता ठाकरे पालवे यांना देण्याची शक्यता आहे.
पाच लाख ३८ हजारांचे आणखी एक बील
विशेष म्हणजे पाच लाख रुपयांच्या बिलाचा अगोदरच वाद असून त्यात गैरव्यवहार झाला असण्याचा आरोप आहे. आता आणखी पाच लाख ३८ हजार रुपयांच्या एका बिलाचा मुद्दा पुढे आला आहे. त्याची चौकशी आता ठाकरे करीत आहेत. त्याचबरोबर २०२१ मध्ये जेव्हा कंट्रोल पॅनल बदलण्यात आले, तेव्हा बिल काढले होते का, याचीही चौकशी आता केली जात आहे. त्याबाबतची कागदपत्रे आणि फाईल ठाकरे यांनी मागवली असून त्याचा अहवालात उल्लेख असणे अपेक्षित आहे. केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेबरोबरच अन्य ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेतही काही गैरप्रकार झाले आहेत का? इंगळे यांचा त्यात किती सहभाग आहे, याची आता चर्चा सुरू झाली असून ठाकरे यांच्या अहवालानंतर आणखी काही गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्यामुळे चौकशी अधिकारी यांनी ही चौकशी पारदर्शकपणे केली आहेका हेही आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे भ्रष्ट अभियंता प्रशांत इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे