पालघर-योगेश चांदेकर
पालघरः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने खा. डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन वसई-विरार आणि पालघर परिसरातील महत्त्वाचे रेल्वे प्रश्न, रेल्वेचे प्रकल्प आणि आरोग्य सेवा सुधारण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे मंत्रांना विविध प्रश्न निदर्शनास आणून त्यावर त्यांनी उपायही सुचवले.
वैष्णव यांच्याशी सदिच्छा भेटीत डॉ. सवरा यांनी केलेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. त्यात मुख्यतः पालघरचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन या रेल्वे स्टेशनचा विस्तार आणि विकास करण्याबाबत तसेच सध्या सुरू असलेल्या आणि भावी काळात सर्व होणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीवर त्यांनी भर दिला.
विभागीय रेल्वे रुग्णालयाचा अभाव
महाराष्ट्रात एकही विभागीय रेल्वे रुग्णालय नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. पश्चिम रेल्वेवर विशेषतः रेल्वे रुग्णालय नसल्याने कर्मचाऱ्यांचे उपचाराअभआवी हाल होतात. मध्य रेल्वेच्या कल्याण किंवा भायखळा परिसरातील रेल्वे रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मुंबई सेंट्रलला रेल्वेचे रुग्णालय असले, तरी तिथेही सेवेमध्ये अनेक अडचणी येतात, असे डॉ. सवरा यांनी निदर्शनास आणले.
वसई किंवा बोरिवलीला रुग्णालय करा
पश्चिम रेल्वेवर वसई किंवा बोरिवली येथे विभागीय रुग्णालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाची मंजुरी तातडीने देण्याची मागणी डॉ. सवरा यांनी केली. अलकापूर आणि ओसवाल नगर या दोन्ही प्रकल्पांचे सर्व तांत्रिक अहवाल पूर्ण झाले असून अंतिम मंजुरीसाठी फाईल रखडली आहे. या मंजुरीला उशीर होत असल्यामुळे वसई-विरार आणि विरार-नालासोपारा या क्रॉसिंगवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब खासदार सवरा यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली.
सकारात्मक चर्चा
वसई-विरार प्रकल्प पालघर स्थानकावर लांबपल्याच्या गाड्यांचे थांबे आणि विभागीय रेल्वे रुग्णालय, रस्ते मंजुरी देणे याबाबतच्या चर्चेत वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जगजीवन राम विभागीय रुग्णालयाच्या सुविधांचे अपग्रेडेशन करून रेल्वे कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याची मागणी त्यांनी केली.
पालघरला वैकल्पिक बोर्डिंग स्टेशन करा
पालघर हे वेगाने विकसित होणारे शहर आणि औद्योगिक केंद्रातून येथील प्रवासी सेवेत संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढवणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आणि पालघर जिल्ह्यात नवीन विमानतळ होत आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन पालघर हे लांब पल्याच्या प्रवाशांसाठी वैकल्पिक बोर्डिंग स्टेशन म्हणून विकसित करण्याची मागणी खा. सवरा यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. तसे झाल्यास बोरिवलीतील गर्दीचा ताण कमी होईल, असेही त्यांनी निदर्शनास आणले. विद्यमान रेल्वे गाड्या तसेच नव्याने सुरू होणाऱ्या विशेष गाड्यांचे थांबे पालघर रेल्वे स्थानकावर देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रेल्वे रुग्णालयासाठी सूचना
डॉ. सवरा यांनी मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम झोनल रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी ३६१ खाटांच्या या रुग्णालयात मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणाची कमतरता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी डॉ. सवरा यांनी काही सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने परिचारिकांची तातडीने भरती करावी, डायलिसिस तंत्रज्ञानाची नेमणूक करावी, बायोमेडिकल अभियंता नियुक्त करून उपकरणे सुरळीत चालण्याची व्यवस्था करावी, सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र नवीन मशीन खरेदी करावी, रोबोटिक सर्जरी सुविधांचा समावेश करून आधुनिक उपचार पद्धतींना चालना द्यावी, अशा सूचना डॉ. सवरा यांनी केल्या असून रेल्वेमंत्र्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.