पालघर-योगेश चांदेकर
वेगवेगळ्या पक्षात अनेक राजकीय नेते असतात. नेते पदासाठी भांडतात आणि पद मिळालं, की त्यांना विकास कामाचा विसर पडतो. आनंदभाई ठाकूर मात्र त्याला अपवाद आहेत पद असो अगर नसो; सातत्यानं जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या पदाचा वापर केवळ विकास आणि विकास यासाठी करायचा, दुसऱ्याच्या राजकारणात लुडबूड करायची नाही, ही त्यांची वृत्ती आहे. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा.

आनंदभाई ठाकूर हे मुळातच समाजवादी विचारसरणीच्या जवळचे असलेले. त्यांच्यावर बोर्डीच्या शाह यांचा तसंच शरद पवार, आर आर पाटील, अजित पवार, गणेश नाईक यांचा मोठा प्रभाव आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यानं तिथं अन्य समाजातून येणाऱ्यांना फारशी संधी नसते, म्हणून अनेक नेते नाउमेद होतात. राजकारण करायचं तरी कशाला असा प्रश्न अनेकांना पडतो आणि मग ते संघटनात्मक पदावर समाधान मानतात किंवा राज्यातल्या आणि केंद्रातल्या पक्षश्रेष्ठींशी चांगला संबंध असेल, तर विधान परिषद किंवा राज्यसभा पदरात पाडून घेतात. यापैकी काहीच जमलं नाही, तर मग मात्र राजकारणात फारसे सक्रिय राहत नाहीत. आनंदभाईंचं तसं नाही. शरद पवार, अजित पवार, नाईक यांच्याशी चांगले संबंध असूनही त्यांनी पदासाठी कधीच हट्ट धरला नाही. पदं मागून घ्यायची नसतात, ती सन्मानानं मिळायला हवीत, असं त्यांना वाटतं. आनंदभाई ज्या डहाणू तालुक्यातून येतात, तो डहाणू तालुका डाव्यांचं वर्चस्व असलेला. पालघर जिल्ह्यावर डावे, उजवे किंवा भाई ठाकूर यांचं वर्चस्व असे. अशा परिस्थितीत आनंदभाईंनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. चार दशकापूर्वी त्यांनी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळून राजकीय कामाचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. डहाणू तालुक्यातून पंचायत समितीवर निवडून येऊन त्यांनी पंचायत समितीचा पहिला सभापती होण्याचा मान मिळवला. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतही काम पाहिलं. शेती आणि शेतकरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शेतकऱ्यांना अनेक लोक सल्ला देतात; परंतु प्रत्यक्ष बांधावरचा सल्ला देणारे अनेक असतात. आनंदभाई मात्र त्याला अपवाद आहेत. त्यांनी कोकणात सर्वात अगोदर व्यावसायिक पद्धतीनं बांबूची लागवड करून शेतकऱ्यांना व्यावसायिक बांबू शेतीचा आदर्श घालून दिला. त्या अगोदर त्यांनी बांबू लागवडीचा अभ्यास केला. कोकणात चांगल्या पद्धतीनं बांबूचं उत्पादन घेता येऊ शकतं, हे त्यांनी पाहिलं. बांबूच्या वेगवेगळ्या जाती आणून त्याची डहाणू तालुक्यात लागवड केली. आता त्यांची बांबूची शेती पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असले, तरी त्या अगोदर आनंदभाईंनी ही शेती फायद्याची कशी होईल, हे स्वतःच्या अनुभवातून इतरांना दाखवून दिलं आणि नंतरच बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आग्रह धरला. त्याचं सामूहिक मार्केटिंगही केलं.
आनंदभाईंवर शरद पवार, अजित पवार गणेश नाईक यांनी मोठा विश्वास टाकला. ठाणे जिल्हा अविभाजित असताना त्यांनी या जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं. नाईक यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आणि ते सोडवून घेतले. नाईक सलग दहा वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आनंदभाईंना होता. डाव्यांच्या आणि उजव्यांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यामध्ये आनंदभाईंचा मोठा वाटा होता. त्यामुळे ठाणे ग्रामीणमध्ये त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या दखलपात्र अशी होती. शरद पवार यांनी त्यांच्या कामाची कायम दखल घेतली. जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद त्यांना दिलं. या माध्यमातून आनंदभाईंनी संपूर्ण जिल्हा समजवून घेतला आणि आपल्या पदाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. आनंदभाईंची दृष्टी आपल्या नेत्यासारखी व्यापक आहे. ते जवळचा विचार करत नाहीत. पालघर जिल्ह्याचा विकास हाच त्यांचा ध्यास असतो. त्यासाठी त्यांची धडपड असते. आनंदभाईंवर असलेल्या विश्वासामुळंच शरद पवार यांनी त्यांना २०१४ ते २०२० अशी सहा वर्षे विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं. विधान परिषदेच्या कार्यकाळात त्यांनी पालघर जिल्ह्याचे अनेक प्रश्न सभागृहात मांडले. वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संपर्काचा उपयोग करून घेऊन अनेक प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली. त्यांचं सर्वात मोठं यश कशात असेल, तर ते सूर्या नदीचं पाणी पालघर जिल्ह्यातील क्षारयुक्त आणि समुद्रकिनाऱ्याच्या भागात वळवणं. यातील बरंच काम आता पूर्ण झालं आहे, तरीही आणखी काम करायचं आहे आणि त्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. सुदैवानं आता पुन्हा पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आनंदभाईंच्या निकटवर्तीयात समावेश असलेल्या नाईकांकडं असल्यामुळं त्यांचं काम अधिक सोपं झालं आहे. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीचं श्रेय घेण्यात अनेक नेते पुढं येत असले, तरी आनंदभाई मात्र त्याला अपवाद आहेत; परंतु पालघर जिल्ह्याच्या निर्मितीचं श्रेय आनंदभाईंना हे कोणी नाकारणार नाही. ते विधान परिषदेचे सदस्य असताना विधान परिषदेत ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न मांडून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आग्रह धरला. विधान परिषदेचे तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांनाही त्याचं म्हणणं आणि त्यांचा या प्रश्नातला आवाका पटला. त्यानंतर विधान परिषदेच्या सभापतींनी आपल्या दालनात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब करून घेतलं.
कोणतंही काम केलं तरी त्याचा श्रेय घ्यायचं नाही. बडेजाव करायचा नाही. काम करून बाजूला व्हायचं, ही आनंदभाईंची वृत्ती. राजकारण करायचं ते सामान्यांच्या विकासाचं, हे त्यांचं धोरण आहे. राजकारणात स्पर्धा असावी. पायात पाय घालण्याचे प्रकार असू नयेत, असं त्यांचं प्रांजळ मत. विकासकामात स्पर्धा करताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवायचं, आर्थिक संस्थांत सर्वांना बरोबर घ्यायचं, ही त्यांची वृत्ती. महात्मा गांधींच्या विचाराचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे. महात्मा गांधींनी कायम तळातील घटकाचा विकास करण्यावर भर दिला. आनंदभाईंचंही तसंच आहे. पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असून या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थी शिकला पाहिजे, पैशासाठी त्याचं शिक्षण थांबू नये, हे त्यांनी कटाक्षानं पाहिलं. त्यांच्या संस्थेच्या आठ माध्यमिक शाळा, दोन महाविद्यालयं एक इंग्रजी माध्यमाची शाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. केवळ शिक्षण देऊन ते थांबले नाहीत, तर आपल्या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजी रोटी कशी मिळेल, त्यांचं पुढच्या पिढीचं जीणं सुसह्य कसं होईल, यावर त्यांनी भर दिला. दुसऱ्याच्या विकास कामात अडथळे आणून आपण विकास करत नसतो, तर दुसऱ्यांनी केलेल्या कामापेक्षा अधिक गतीनं काम करून इतरांपेक्षा आपलं काम उजवं कसं आहे, हे दाखवता येत, हे आनंदभाईंनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे. आनंदभाईंना सगळी पदं स्वतःकडं घेतली नाहीत. आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कसा वाढला जाईल, हे त्यांनी पाहिलं. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा मजूर संघ, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, डहाणू बँक आदी ठिकाणी कार्यकर्त्याची वर्णी लावून त्यांचा सन्मान कसा वाढवता येईल, यावर त्यांनी सातत्यानं भर दिला आनंदभाईंचे मधुकरराव पिचड, आर. आर. पाटील, छगन भुजबळ आदींशी सातत्यानं ऋणानुबंधाचे संबंध राहिले. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सूर्या नदीचं पाणी पालघर जिल्ह्यात वळवण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेऊन तो अमलातही आणला. त्याचबरोबर भारतीय कृषी अनुसंधान परिषद व अन्य महत्त्वाच्या संस्थांवर त्यांनी काम केलं. आनंदभाईंचं राजकारण हे साधनशूचितेसाठी असतं. पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील जनता हेच आपलं दैवत असून या दैवताला नमन करून दैवताच्या ज्या ज्या इच्छा आहेत, त्या त्या इच्छा कशा पूर्ण करता येईल आणि सामान्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी आपल्या पदाचा कसा वापर करता येईल, यावर त्यांनी सातत्यानं भर दिला. आनंदभाई हे मृदू स्वभावाचे. सर्वांना बरोबर घेऊन चालणारे. स्वकीयांबरोबर विरोधकांशी मैत्रीचे संबंध जपणारे, म्हणून त्यांना अजातशत्रू असं म्हटलं जातं. केवळ राजकीय प्रश्नांवर भर न देता त्यांनी पालघर या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आताही पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जात आहे. वाढवण बंदर होत आहे; याशिवाय मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, चौथी मुंबई, आणि पालघर जिल्ह्यात होणारं विमानतळ तसेच वेगवेगळ्या उद्योजक संस्था पालघरला येत असून या सर्वांच्या माध्यमातून पालघरचा एकात्मिक विकास व्हावा आणि या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं, ही त्यांची मनोमन इच्छा आहे. आपल्या पदाचा वापर त्यासाठीच करता यायला हवा, हे त्यांचं मत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा!