पालघर-योगेश चांदेकर
शिकवण्याऐवजी अन्य कामांकडेच शिक्षकाचे लक्ष
शिक्षण विभागाचा अंकुश नाही
पालघरः पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या ठेकेदारीचा यापूर्वी पर्दाफाश झाला होता. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. एका कथित पत्रकार शिक्षकावर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवले होते; परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शिक्षकांची अन्य कामांची ठेकेदारी कशी खपवून घेतो, तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठांचे हातही या प्रकरणात ओले झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाळांना साहित्य पुरवण्याचे काम शिक्षक वेगवेगळ्या आस्थापनाच्या माध्यमातून करीत होते. त्यात शिकवण्याव्यतिरिक्त अन्य खासगी कामे ही शिक्षक करीत असतात. पालघर जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जाच्या नावाने आधीच बोंब असताना त्यात शिक्षकांचे शिकवण्याव्यतिरिक्त अन्य उद्योगातच जादा लक्ष आहे. आता त्यात आणखी एका कामाची भर पडली असून डहाणू तालूक्यातील रणकोळ केंद्रातील शिक्षक बळवंत क्षीरसागर यांनी तर पत्नीच्या नावे प्राप्तिकर सल्लागाराचा परवाना घेतला असून प्राप्तिकर परताव्याचे अर्ज भरून देण्याचे काम तेच करत आहे. त्या माध्यमातून ते हजारो रुपये कमवीत आहेत.
खासगी कामातील कमाईवर लक्ष
वास्तविक शिक्षकांना शाळा सोडून अन्य खासगी कामे करता येत नाहीत; परंतु अनेक शिक्षकांनी वेब कोर्स किंवा आवर्ती जमा ठेव योजना तसेच अन्य कामे सुरू केली आहेत. काही शिक्षक प्लॉटिंगचे व्यवसाय करतात, तर काही शिक्षकांनी बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. त्याचबरोबर डहाणू तालुक्यातील तसेच अन्य शाळातील गटप्रमुख तसेच शिक्षकांना हाताशी धरून काही शिक्षकांनी स्वतःची स्टेशनरीची दुकाने सुरू केली असून, त्यातून संबंधित शाळांना शालेय साहित्य पुरवले जाते. त्यातली बिलेही वादग्रस्त ठरली आहेत. एका प्रकरणात जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश निकम तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी कारवाई सुरू केली होती. त्यात शाळांना पुरवण्यात आलेले मोजे निकृष्ट दर्जाचे आढळले होते.
क्षीरसागरांचा मुजोरपणा
या पार्श्वभूमीवर बळवंत क्षीरसागर नावाचे शिक्षक शाळेपेक्षा प्राप्तिकर परताव्याला अधिक महत्त्व देत असून विशेष म्हणजे शासकीय कामे या शिक्षकाला कशी दिली जातात हा आता एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. क्षीरसागर यांनी पत्नीचे नावे एजन्सी घेतली असून विविध कंपन्या, एकात्मिक बालविकास प्रकल्प, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलासरी, डहाणू, मोखाडा आदी ठिकाणची तहसील कार्यालये तसेच अन्य संस्थातील कर्मचाऱ्यांचे प्राप्तिकर परतावे भरून देण्याचे काम हा शिक्षक करतो. त्यासाठी प्रत्येकाकडून दीडशे रुपये आकारणी केली जाते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रचे सरासरी दहा-पंधरा कर्मचारी आणि तहसील कार्यातील सरासरी शंभर-दीडशे कर्मचारी लक्षात घेतले, तर या शिक्षकाच्या कामाची व्याप्ती आणि त्याला मिळणारे पैसे लक्षात येतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, माझे कुणीही काही करू शकत नाही, असे उर्मटपणाचे उत्तर ते देतात. याचा अर्थ त्यांना शिक्षण विभागातील कुणाचा तरी वरदहस्त असावा, असे मानायला जागा आहे.
खासगीत प्राप्तिकराची कामे केल्याची कबुली
विशेष म्हणजे शिक्षकांना अशा प्रकारची कामे करता येत नसताना ते पत्नीच्या नावे एजन्सी घेऊन स्वतःच असे काम करत आहेत आणि या प्रकरणाची कबुली ते खासगीत देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पॅन नंबर घेऊन, ऑनलाईन फॉर्म भरले जातात. त्यासाठी संबंधित शिक्षकाची भेट घेण्याची गरज नाही. क्षीरसागर यांना कागदपत्रे पाठवली आणि पैसे पाठवले, की ते ऑनलाईनच सर्व कामे करून देतात. त्यांनी स्वतःच तसे मान्य केले आहे. त्याबरोबरच प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखाचे टॅन नंबर मागून त्यांची कामे मिळवून ते ही कामे करून देतात. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात.
जिल्हा परिषदेचा वरदहस्त
एकात्मिक बाल विकास प्रकल्प हा तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अखत्यारित आहे. या प्रकल्पाचे कामही ते करून देतात. विशेष म्हणजे शासनाला शिक्षकांनी शाळाबाह्य काम करणे अपेक्षित नसताना शासनाच्याच महसूल, एकात्मिक बालविकास प्रकल्प, ग्रामविकास विभाग अशा विभागाची कामे शिक्षक करीत असेल, तर त्याच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी कंपनीची कामेही या शिक्षकाकडे असून त्याच्यावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभाग आणि शिक्षण विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
कोट
‘प्राप्तिकर परताव्याचे काम करण्याची एजन्सी पत्नीच्या नावे असली, तरी ही कामे मीच करतो. माझे कुणीही काही करू शकत नाही. कितीही तक्रारी केल्या, तरी मला फारसा फरक पडत नाही.
बळवंत क्षीरसागर, शिक्षक, रणकोळ केंद्र