पालघर-योगेश चांदेकर
आशागडच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणखी कारनामे
जिल्हा परिषदेचे चौकशीचे आदेश
‘लक्षवेधी’च्या वृत्त मालिकेची दखल
पालघरः डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे गैरव्यवहाराचे एका मागून एक नमुने उघडकीस येत असून त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चर्चिला जात आहे. ‘लक्षवेधी’ने याप्रकरणी वृत्तमालिका प्रकाशित केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी आता आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय गडग यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून डहाणू तालुक्यातील आशागड, गंजाड, ऐना आदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरकारभाराची वारंवार चर्चा होत आहे. याबाबत यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यात तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांचे नावही आले होते. आता हे अधिकारी बदलून गेले असले, तरी आताचे अधिकारी किती वेगाने कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
डॉ. अक्षय गडग यांना कुणाचा आशीर्वाद?
डॉ. गडग यांच्याबाबत तर अनेक गंभीर तक्रारी असूनही त्यांना का पाठीशी घातले गेले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. डहाणू तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानव विकास शिबिराठी १६ लाख ४५ हजार रुपये अनुदान आले होते. ही रक्कम ज्या स्वयंसेवी संस्थेने मानव विकास शिबीर आयोजित केले होते, त्या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यात जमा करण्याऐवजी ती रक्कम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बचत खात्यावर तसेच गंजाडच्या उपसरपंचाच्या भावाच्या बचत खात्यावर जमा केल्याचा प्रकार ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणला.
चौकशी सुरू
या बातमीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल मागवला आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी वेगवेगळ्या कारणासाठी कशाप्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा व्यक्त करतात, याची चर्चा सुरू झाली आहे.
आरोग्य केंद्रातील बॅटऱ्यांची परस्पर विक्री?
कंत्राटी पद्धतीने गाडी भाड्याने लावणाऱ्यांकडून कसे कमिशन घेतले जाते, याचा किरण डोंगरकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात तपशील दिला होता. असे असताना डॉ. गडग यांचा आता एक नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात काही खरेदी करायची असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही जुन्या वस्तूंची विल्हेवाट किंवा विक्री करायची असेल, तर त्यासाठी रुग्ण कल्याण समितीची बैठक घेऊन परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळाल्यानंतर खरेदी करण्यास मान्यता दिली जाते किंवा विक्री करण्यास मान्यता दिली जाते. विक्री केलेली रक्कमही रुग्ण कल्याण समितीच्या खात्यात जमा करणे आवश्यक असते; परंतु डॉ. गडग यांनी २०२३ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोठमोठ्या ७८ बॅटऱ्यांची परस्पर विक्री केल्याचा आरोप होत असून त्याचे पैसेही परस्पर लाटल्याचे सचिन ठाकरे यांनी सांगितले आहे.
कारवाईकडे लक्ष
याप्रकरणी थेट तक्रारी होत असून आता जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकांशीही डॉ. गडग यांचे वागणे चांगले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. एक परिचारिका गर्भवती असतानाही तिला जाणीवपूर्वक रात्रीची ड्युटी लावण्यात आल्याचे तिच्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर परिचाचारिकांची बिले काढण्यासाठी त्यांची अडवणूक केली जात होती असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. मात्र या तक्रारीकडेही दुर्लक्ष करण्यात आले
महिला आयोगाकडे तक्रारी जाण्याची शक्यता
महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ कसा केला जातो, याचे गंभीर आरोप डॉ. गडग यांच्या विरोधात असून याबाबत जिल्हा परिषदेने गांभीर्याने दखल घेतली नाही, तर राज्य महिला आयोगाकडे याच्या तक्रारी जाऊ शकतात आणि त्यामुळे पालघर आरोग्य विभागाचा राज्यभर पंचनामा होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी अशा गंभीर प्रकरणात आता काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे डॉ. अक्षय गडग यांचे महिलांशी बोलणे ही अतिशय उद्धटपणाचे असल्याचा आरोप अनेक परिचारिकांनी केला आहे. त्याचबरोबर डॉ. गडग यांच्यावर वाहन चालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपान करीत असल्याचा गंभीर आरोप केला असताना आता त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल.