पालघर-योगेश चांदेकर
श्वानपथक, धातूशोधक पथक घटनास्थळी
पोलिस छावणीचे स्वरूप
पालघरः पालघर जिल्हा मुख्यालयाच्या संकुलामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा ‘मॉक ड्रिल’चा प्रकार असावा असे वाटत होते; परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर या नावाने हा ई-मेल आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने आणि हा ई-मेल खरा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाल्याने मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकाम्या करण्यात आल्या.
प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सर्व यंत्रणांना कामाला लावल असून तपास सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून बॉम्ब शोध पथक, श्वानपथक आदीमार्फत शोध घेतला जात आहे. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे स्वतः तपासावर नियंत्रण ठेवून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी ई-मेल आला; परंतु कार्यालय सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता सुमारास हा ईमेल चेक केल्यानंतर सर्वांची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी या ई-मेलची तपासणी करून तो खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग ‘ॲक्शन मोड’वर आले.
कर्मचारी, नागरिक सुरक्षित स्थळी
जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती, जिल्हा परिषद कार्यालय आदी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यालयाबाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनाही कार्यालयापासून दूरच थांबवून ठेवण्यात आले आहे. या सर्व इमारतींभोवती आता पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ बॉम्ब शोध पथक व पोलिसांच्या अन्य सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.
आपत्ती निवारण दल घटनास्थळी
या इमारतीच्या ठिकाणी राष्ट्रीय आपती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दल हजर झाले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सावधगिरीचा इशारा तसेच आपत्कालीन परिस्थिती आराखड्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या असून पालघर पोलिसांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीत घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात मिळवलेल्या यशाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवून जाण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा तिथे गुंतून पडल्याने पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आली.
बाँबस्फोटाची वेळही नमूद
पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासह अनेक महत्त्वाची आस्थापने असून जिल्हा मुख्यालयाला बाँबने उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे आता सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेल्या ई-मेल मध्ये सायंकाळी चार वाजता बॉम्बस्फोट होईल असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण तपासणी सुरू आहे. या संकुलातील कानाकोपरा धुंडाळला जात आहे; परंतु अद्याप पोलिस यंत्रणेला संशयास्पद काहीही आढळलेले नाही.
अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
हा ई-मेल पोलिसाकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह, प्रशासकीय इमारत अ आणि ब तात्काळ खाली करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क करावा .
कोणीही अफवा पसरवू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
‘जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या बाँबस्फोटाच्या धमकीनंतर येथे पूर्वदक्षता म्हणून वेगवेगळ्या यंत्रणांना पाचारण केले आहे. बाँबशोधक, धातूशोधक पथकेही आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी सुरू आहे.
बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर