पालघर-योगेश चांदेकर
पालघरः दिवा-भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सरवा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नाकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात डॉ. सवरा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनास आणत आहेत. त्यासंबंधीची निवेदनेही ते देत आहेत. गेल्या दहा-वीस वर्षात दिवा-भिवंडी-अंबाडी- कुडूस- वाडा- विक्रमगड या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढणे आवश्यक आहे. या भागात नवीन लोहमार्ग टाकला, तर प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन पर्यंत जाणे शक्य होईल. तसेच थेट कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ होईल. याशिवाय भिवंडी-वाडा हे लोहमार्गाच्या नकाशावर येऊ शकतील, असे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
लांब पल्ल्याच्या चार गाड्यांना थांबा द्या
याबाबत खा. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वसई येथे मेगा टर्मिनल सुरू करण्याबाबत वैष्णव यांनी दिलेला आश्वासनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय पश्चिम रेल्वे मंडळाच्या बैठकीत कच्छ एक्सप्रेस, दादर बिकानेर एक्सप्रेस, बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाजीपूर एक्सप्रेस या लांब पल्यांच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून याठिकाणी देशभरातील कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करतात; परंतु त्यांना दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांना मुंबई किंवा सुरतला गाड्या पकडण्यासाठी जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालघर या जिल्हास्तराचा विचार करून रेल्वे मंडळाला पालघर येथे या चार लांब पडलेल्या गाड्यांना थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मेमो गाड्या सुरू करण्याची मागणी
रेल्वेची आरक्षित जागा नालासोपारामधील निलमोरे या गावात आहे तलावाच्या आकाराची ही जागा बाग आणि क्रीडांगणासाठी महापालिकेने आरक्षित केले आहे. या जागेवर खर्च करण्यासाठी रेल्वेने ही जागा वसई विरार महापालिकेकडे द्यावी आणि त्यापैकी दहा हजार चौरस फुटाची जागा कमी होण्यासाठी द्यावी, अशी मागणी खा. सवरा यांनी वैष्णव यांच्याकडे केली. मेमो गाड्या घोलवडपर्यंत आणण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय बलसाड फास्ट पॅसेंजरपूर्वी सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठपर्यंत मेमो गाड्या सुरू कराव्यात, सुरतसाठी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान आणि सायंकाळी चार ते संध्याकाळी सात दरम्यान पॅसेंजर अगोदर मेमो सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.
उपनगरीय सेवा वापीपर्यंत वाढवा
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सध्या डहाणूपर्यंत आहे. ती घोलवड किंवा उंबरगाव, वापी पर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही सेवा वाढवली, तर त्याचा फायदा विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल असे खा. सवरा यांनी म्हटले आहे.