क्रिकेट चाहत्यांना आता त्यांचा नवीन विश्वविजेता मिळाला आहे, आणि तो आहे दक्षिण आफ्रिका! वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला.
या सामन्यात दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपल्या संघाला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ज्यामुळे पाकिस्तानला सलग दुसऱ्या फायनल सामन्यात पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तानचा सलग दुसऱ्या फायनलमध्ये पराभव –
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शर्जील खानने 76 धावांची शानदार खेळी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर काही फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कामरान अकमल केवळ 2 धावा करून लवकर बाद झाला, तर कर्णधार मोहम्मद हफीझने 17 आणि शोएब मलिकने 20 धावांची छोटी खेळी केली. शेवटी उमर अमीन (36) आणि आसिफ अली (28) यांनी वेगवान धावा करत पाकिस्तानला 20 षटकांत 5 गडी गमावून 195 धावांपर्यंत मजल मारुन दिली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीत हार्डस विल्जोएन आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 2 गडी, तर ड्वेन ओलिव्हिएरने 1 गडी टिपला.
प्रत्युत्तरात 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर हाशिम आमला 18 धावांवर बाद झाला, पण त्यानंतर मैदानावर एबी डिव्हिलियर्सने तुफान आणले. त्याने 60 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने 120 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार ठोकले. त्याला जेपी ड्युमिनीने 28 चेंडूत 50 धावांची जलद अर्धशतकी खेळी करत उत्तम साथ दिली. दक्षिण आफ्रिकेने सहजपणे लक्ष्य गाठत डब्ल्यूसीएल 2025 चा किताब पटकावला.
एबीने पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई –
पाकिस्तानच्या गोलंदाजांना एबीच्या या तुफानी खेळीपुढे काहीच करता आले नाही. सलग दुसऱ्या वेळी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच डब्ल्यूसीएलचा किताब जिंकत इतिहास रचला. एबी डिव्हिलियर्सची ही खेळी क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायम राहील.