पालघर-योगेश चांदेकर
पालघर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित
प्रवाशांच्या सुविधांसाठी सुचवले विविध उपाय
पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले खा. डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर मतदार संघातील विविध रेल्वे प्रश्नांकडे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे लक्ष वेधले. नवीन गाड्या सुरू करण्यासोबतच लांबपल्ल्याच्या गाड्यांना पालघर येथे थांबा देण्याची तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्याची मागणी डॉ. सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील रेल्वे समस्यांबाबत वैष्णव यांच्यासोबत डॉ. सवरा यांनी चर्चा केली. यावेळी किसान रेल सुरू करण्याबाबत चर्चा झाली. डहाणू-नाशिकला पर्यायी मार्गाबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा- इगतपुरी आणि ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार- मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक या पर्यायी मार्गाबाबत विचार करावा अशी मागणी खा. सवरा यांनी केली. त्याचबरोबर डीएफसीसी रेल्वे मार्गाखाली साचणाऱ्या पाण्यावर उपाय करणे, नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे, पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या, त्याबाबत उपाययोजना करणे, बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये थांबे देण्यात यावे या व इतर बाबीवर सकारात्मक चर्चा झाली.
पालघर-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी
कोकणातील पालघर या उत्तरेकडील शेवटच्या स्थानकापासून दक्षिण कोकणातील सावंतवाडी या शेवटच्या स्थानकापर्यंत जाण्यासाठी थेट पॅसेंजर सुरू करण्याची मागणी खा. सवरा यांनी अश्विन यांच्याकडे केली आहे. दक्षिण कोकणातील विविध भागातील लोक पालघर, वसई, डहाणू आदी भागात नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी पॅसेंजरची आवश्यकता आहे. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नववर्ष आदी सणासाठी या भागातून लोक दक्षिण कोकणात जात असतात. त्यांची सोय करण्यासाठी पालघर ते सावंतवाडी अशी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी डॉ.हेमंत सवरा यांनी केली आहे.
पालघरला लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या
पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून आणि आता या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण होत असताना येथे अनेक लांब पल्याच्या गाड्यांना थांबा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबई क्षेत्र प्रादेशिक विकास प्राधिकरण थेट पालघर जिल्ह्यात पोहोचले आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग इथून जात आहे. पालघर-सिन्नर महामार्गाची घोषणा झाली आहे. पालघर हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण असतानाही येथे अनेक गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर इंदूर-दौंड, बांद्रा- भावनगर कच्छ एक्सप्रेस, दादर-एकता नगर एक्सप्रेस, दादर-बिकानेर एक्सप्रेस, दादर-अजमेर एक्सप्रेस, सुरत इंटरसिटी एक्सप्रेस, बांद्रा-गाजीपूर एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना पालघर येथे थांबा देण्याची मागणी सवरा यांनी रेल्वेमंत्री यांच्याकडे केली आहे.
पालघर स्थानकावरील पायाभूत सुविधांकडे वेधले लक्ष
पालघर रेल्वे स्टेशनचा दर्जा वाढवावा, या स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मची संख्या वाढवावी अशी मागणी करताना त्यांनी म्हटले आहे, की या स्टेशनवर सध्या तीन प्लॅटफॉर्म आहेत. विरार-डहाणू विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत येथील रेल्वे ट्रॅकची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या येथे चार ट्रॅक आहेत. आणखी दोन ट्रॅकला मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्लॅटफॉर्मची संख्या वाढवावी, त्याचबरोबर ट्रेन सुरू कराव्यात, या स्थानकावर रेल्वे बुकिंग काउंटर, डिजिटल कोच इंडिकेटर्स, ट्रेन इंडिकेटर, सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. प्लॅटफॉर्म लांबी इतकेच छत तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी रेल्वेमंत्र्याच्या निदर्शनास आणले.
डहाणू, बोईसरचे प्रश्न
डहाणू रोड हे मुंबई उपनगरी लोकलचे शेवटचे स्थानक असून या ठिकाणी तपासणी कर्मचारी, चौकशी कक्ष, उद्घोषक, डिजिटल कोच इंडिकेटर, सीसीटीव्ही, एस्केलेटर आदी सुविधा वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे. बोईसर येथेही चौकशी कक्ष, उद्घोषणा कक्ष, सीसीटीव्ही, एस्केलेटर याशिवाय प्लॅटफॉर्मवर छत वाढवण्याची मागणी त्यांनी केली
वसई रोडचा टर्मिनल म्हणून विकास करा
वसई रोड हे पश्चिम रेल्वेवरचे अतिशय महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणाहून दक्षिण कोकण आणि पुण्याकडे गाड्या जातात. टर्मिनल म्हणून या स्टेशनचा विकास व्हावा. या ठिकाणाहून पुण्यासह अन्य ठिकाणी आणखी गाड्या सुरू कराव्यात, वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर या परिसरात प्रवाशांच्या सुविधासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वैतरणा स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या छताची लांबी वाढवावी, या ठिकाणी एस्कलेटर, लिफ्ट आदी सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. सफाळे स्टेशनवरील प्लॅटफार्मची लांबी वाढवण्याची असाही प्रश्न सवरा यांनी मांडला.
केळवे पर्यटन स्थळाच्या सुविधा
केळवे हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी, प्रतीक्षा कक्ष सुरू करावा, याशिवाय स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही, एस्केलेटर, लिफ्ट अन्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करून उमराळी येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून तेथे पंधरा डब्याची लोकल थांबेल अशी व्यवस्था करावी. या ठिकाणी एस्केलेटर्स, सीसीटीव्ही सुरू करावा, अशा मागण्या डॉ. सवरा यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केल्या आहेत.
मेमो ट्रेन घोलवडपर्यंत आणा
मेमो ट्रेन घोलवडपर्यंत वाढवावी, बोरिवली ते डहाणू रोडपर्यंत मेमो आली तर प्रवाशांची सोय होऊ शकेल. ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम डहाणू रोडपर्यंत वाढवावी, चर्चगेट सेक्शन विरारपर्यंत आणावा, नायगाव-घोलवड सेक्शन मध्ये एस्केलेटर सुरू करावेत, विरार-डहाणू विभागात गर्दीच्या काळात ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवावी, डहाणू रोड ते नालासोपारा, वसई आणि विरारपर्यंत ही सुविधा वाढवावी, पनवेल, कल्याण ते डहाणू रोड पर्यंत मेमो ट्रेन सुरू कराव्यात अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.