पालघर-योगेश चांदेकर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही लक्ष घालणार
एक तपाहून अधिक काळ नियम धाब्यावर
पालघरः शिक्षकांनी शाळेत शिकवण्याचे काम करावे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे आणि नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे नियम असतानाही पालघर जिल्ह्यातील अनेक तालूक्यातील शिक्षक मात्र शिकवण्यापेक्षा दुबार व्यवसाय करण्यात धन्यता मानीत आहे. त्यातून या शिक्षकांना हजारो रुपयांची वरकमाई होत असून या प्रकरणाकडे जिल्हा परिषदेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांचे अभय असल्यामुळे डहाणू तालूक्यातील रणकोळ केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमीक शिक्षक बळवंत क्षीरसागर यांच्यासह दुबार व्यवसाय करणाऱ्या अन्य शिक्षकांचीही मुजोरी वाढली आहे. ते कुणालाच जुमानायला तयार नाहीत. दरम्यान, ‘लक्षवेधी’ने याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर आता क्षीरसागर यांना नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात एक तर अगोदरच शिक्षकांचे प्रमाण कमी आहे. त्यातच शिक्षक शिकवण्याव्यतिरिक्त अन्य कामेच जास्त करत आहेत. कोणी वेब क्लास घेतो, कोणी प्लॉटिंगचे व्यवसाय करतो. या व्यवसायाच्या माध्यमातून शिक्षकांना चांगले पैसे मिळत असल्याने ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त अशी परिस्थिती असते. त्यात काही ठिकाणी तर शिक्षकांचे साटेलोटे आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये काही शिक्षक आठवड्यातून काही दिवस गैरहजर राहतात, त्यावेळी त्यांचे काम दुसरे शिक्षक करतात, तर उर्वरित दिवसात दुसरे शिक्षक गैरहजर राहतात आणि त्यांचे काम अगोदर गैरहजर राहिलेले शिक्षक करतात. हे सर्व शिक्षण विभागाच्या नाकावर टिच्चून चालले आहे.
संघटनेचे बेशिस्त शिक्षकांना अभय
शिक्षक संघटना ही अशा शिक्षकांना पाठीशी घालतात. एका शिक्षकाकडे त्यामुळे अधिक वर्गाची जबाबदारी येत असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा शिक्षण विभाग शाळांची कधी आणि किती तपासणी करतो, हा आता संशोधनाचा भाग आहे. डहाणूसह अन्य तालुक्यात शिक्षकांशी केंद्रप्रमुख आणि संबंधित शिक्षकाचे कसे संबंध असतात आणि ही बिलेही कशी वादग्रस्त ठरतात, याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात सापडतात. काही शिक्षकांनी तर वेब कोर्सेस सुरू करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या गळाला लावले आहे. त्यातून ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमावत आहेत. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी संबंधितांवर चौकशीचा आणि कारवाईचा बडगा उगारला होता.
शिक्षकांच्या मनमानीमुळे खालावला दर्जा
एकीकडे पालघर जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, असे ‘असर’ या संस्थेच्या पाहणीमध्ये दिसले आहे. विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत किती मागे आहे, हे स्पष्ट झाले होते. वास्तविक शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून काम करायला हवे; परंतु शिक्षक तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठया गावात राहतात आणि मन मानेल तेव्हा शाळेत येतात, असे प्रकार होत असून त्यामुळे अनेकदा विद्यार्थी वर्गात गोंधळ घालतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणीच नसते.
शिक्षकांच्या ठेकेदारीला शिक्षण विभागाचा आशीर्वाद
शिक्षकांची अन्य कामाची ठेकेदारी शिक्षण विभाग सांभाळून घेतो आणि वरिष्ठांचे या शिक्षकांना अभय आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यातच शिक्षक संघटना अशा प्रकारे गैरकाम करणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालत असून त्यात शिक्षक संघटनांचे काही पदाधिकारी असे दुबार व्यवसाय करण्यात मग्न आहेत. शिक्षकांना दुबार व्यवसाय करता येत नाहीत, हा नियम असतानाही पालघर जिल्ह्यात मात्र या नियमांचे उल्लंघन होते.
बळवंत क्षीरसागरांना तर सरकारी प्रसाद!
शिक्षक बेकायदेशीर कामे करत असताना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे हे कसे लक्षात येत नाही, असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला आहे. बळवंत क्षीरसागर यांचे प्रकरण तर आणखीच गंभीर आहे. पत्नीच्या नावे एजन्सी घेऊन त्या मार्फत प्राप्तिकर सल्लागाराची कामे करणे, प्राप्तिकर परताव्याचे फॉर्म भरून देणे असे कामे ते करत असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा एकात्मिक बालविकास विभाग, केंद्र शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसीलदार कार्यालयाची कामेही या शिक्षकाला मिळत असतील, तर हा शिक्षक प्राप्तिकर परताव्याची कामे करतो कधी आणि शाळेत उपस्थित असतो कधी असा प्रश्न कुणालाही पडेल. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला विचारणा केली असता, माझे कुणीही काही करू शकत नाही, असे मुजोरपणाचे उत्तर तो देत असेल, तर हा मुजोरपणा अवैध मार्गाने मिळणाऱ्या पैशातून येत असतो. दरम्यान, याप्रकरणी आता शिक्षण विभाग क्षीरसागर यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. याप्रकरणी त्यांचा खुलासा आल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनीही या प्रकरणात आपण लक्ष घालत असून चौकशीच्या सूचना दिल्याचे सांगितले. रानडे हे पूर्वी नगर विकास मंत्रालयात संचालक होते. नव्या दमाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून ते जिल्हा परिषदेत चाललेल्या अशा अनेक गैरप्रकारांना कसा आळा घालतात, याचे पालघर जिल्हावासीयांना औत्सुक्य आहे.