banner 728x90

एका दिवसात, एका रेल्वे स्थानकावर, एक हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड, अडीच लाख रुपये दंड वसूल

banner 468x60

Share This:

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात तिकीटधारक प्रवासी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत.

या तक्रारींची दखल घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे.

banner 325x300

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवून, सुमारे एक हजार विनातिकीट प्रवाशांना पकडून अडीच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, मध्य रेल्वेच्या ‘केंद्रित तिकीट तपासणी मोहिमे’त १९५ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पश्चिम आणि मध्य रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत आहे. तसेच वातानुकूलित, प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट, पास खरेदी केलेल्या प्रवाशांना विनातकिटीक प्रवाशांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट कमी करण्यात आले असून त्यामुळे या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट किंवा सामान्य लोकलचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

अनेक वेळा विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमध्ये बसलेले असतात आणि तिकीटधारक प्रवासी उभ्याने प्रवास करीत असतात. असाच प्रकार प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी डब्यात घडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने सोमवारी कांदिवली रेल्वे स्थानकात ‘फोर्ट्रेस चेक’ मोहीम राबवली. रेल्वे स्थानकातील पादचारी पूल, स्थानकाचे प्रवेशद्वार, फलाटांवर तिकीट तपासणीस, आरपीएफ जवान यांनी तिकीट तपासणी मोहीम राबवली.

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी पथकातील २८ कर्मचारी, आरपीएफचा एक जवान, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे २ जवान आणि कांदिवली रेल्वे स्थानकातील १७ कर्मचारी अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात केला होता. दिवसभरात ९२० विनातिकीट प्रकरणे हाताळण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेवरील लोकलमधील प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढल्या होत्या. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी विनातिकीट प्रवासी प्रथम श्रेणी डब्यांमधून प्रवास करीत होते. त्यामुळे सोमवारी ‘केंद्रित तिकीट तपासणी मोहिमे’अंतर्गत विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बरमार्गावरील सुमारे १७ लोकलमध्ये तपासणी करण्यात आली. यामध्ये सकाळी गर्दीच्या वेळी अंबरनाथ ते दादर, बदलापूर ते दादर, ठाणे ते दादर, ठाणे ते पनवेल, पनवेल ते कुर्ला आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटीवरून सुटलेल्या बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, पनवेल या लोकलमध्ये सखोल तपासणी करण्यात आली. याद्वारे १९५ विनातिकीट प्रवाशांना पकडून ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!