पालघर-योगेश चांदेकर
पालघरः दादरा नगर हवेली व दीव दमण परिसरात विक्रीसाठी असलेले स्वस्त दरातील मद्य महाराष्ट्रात आणून ते विकण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू येथील पथकाने तसेच पालघरच्या भरारी पथकाने उघडकीस आणून मारुती स्विफ्ट कारसह आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त केला.
पालघर हा दादरा नगर हवेली व दीव दमणला लागून असलेला जिल्हा आहे. या दोन केंद्रशासित प्रदेशात मद्यावर सीमाशुल्क अतिशय कमी असते. त्यामुळे हे मद्य स्वस्त पडते. सीमाशुल्क चुकवून असे मद्य महाराष्ट्रात आणून त्याची विक्री केली जात असते. यापूर्वी महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील वाहनांचा वापर अवैध मद्य आणण्यासाठी केला जात असे. आता गुजरातमधील वाहनांचा वापर सुरू करण्यात आला असल्याचे नव्या कारवाईतून उघड झाले आहे.
तलासरी तालुक्यात कारवाई
उत्पादन शुल्क विभागाचे डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, अभिजीत मानकर आदींचे भरारी पथक तलासरी तालुक्यात गस्त घालत असताना त्यांनी गुजरात राज्यातील मारुती स्विफ्ट कार (क्रमांक जीजे १५ पीपी ९६१५) ही थांबून तिची तपासणी केली, तेव्हा त्यात मद्याची तस्करी होत असल्याचे आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्याचे अठरा बॉक्स जप्त केले. हे मद्य दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी होते; परंतु कर चुकवून तस्करीच्या मार्गाने ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कारसह अवैध मद्याचे बॉक्स असा मिळून आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
‘यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे आयुक्त प्रदीप पवार, पालघरचे उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांना संदीप अहिरे, सत्यवान चोरघे, अमोल नलावडे, दीपक शेवाळे, प्रदीप गांगुर्डे, शशिकांत पाटील आदींनी मदत केली.

















