पालघर-योगेश चांदेकर
पालघरः एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यात वृद्धांना येत असलेल्या अडचणीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकरणातल्या एका टोळीला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना वृद्धांना किंवा अशिक्षित व्यक्तींना अनेकदा अडचणी येतात. त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत एटीएम कार्ड बदलून त्यांच्या कार्डातून पैसे काढण्याचे प्रकार अलीकडे सर्वत्र वाढले आहेत. वृद्ध एटीममधून पैसे काढताना त्यांचा पिन लक्षात ठेवला जातो. हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून नंतर संबंधितांच्या खात्यावरून पैसे काढले जातात. पालघरमध्येही असाच प्रकार घडला.
महिनाभराने लागला छडा
भगवान नामदेव हातेकर हे वृद्ध मजुरी करून जगतात. ते २७ सप्टेंबर २०२४ रोजी केळवा माहीम येथील ‘बँक ऑफ इंडिया’च्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्या वेळी येथे आलेल्या तिघांनी संगनमत करून त्यांना विश्वासात घेऊन पैसे काढून देतो, असे सांगितले. त्यांच्या ताब्यातील एटीएम घेऊन नंतर त्यांना दुसरेच एटीएम कार्ड दिले आणि नंतर संबंधित वृद्धाच्या खात्यावरील पन्नास हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याबाबत हातेकर यांनी पालघर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस अधीक्षकांना समजले गांभीर्य
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना या प्रकरणाचा तपास करण्याची सूचना केली. त्यानुसार पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक त्यासाठी नेमले. पालघर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना पोलिस उपनिरीक्षक रोहित खोत यांना गुप्त बातमीदाराकडून एटीएम कार्ड बदलून, फसवणूक करणाऱ्या टोळी संबंधी माहिती मिळाली.
टिटवाळ्यातून तिघांना अटक
त्यानंतर पोलिस पथकाने टिटवाळा बनेली येथे जाऊन या टोळीला अटक केली. किस्मत बरकत अली शेख (वय २७ राहणार बनेली तालुका कल्याण), असमत बरकत अली शेख (रा. बनेली टिटवाळा तालुका कल्याण), हरेश राहुल प्रधान उर्फ दैत्या (रा. म्हारळ आंबेडकर नगर, बुद्ध विहारामागे कल्याण) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कार (क्रमांक एम एच झिरो दोन सीडी ४४ ६१) व ३० हजार रुपये रोख असा पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांच्या चौकशीत या टोळीत दीपक बिपीन झा (रा. रमाबाई आंबेडकर नगर उल्हासनगर) याचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पाच गुन्हे दाखल
या टोळीला अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले, की हे सर्व आरोपी एटीएममध्ये थांबून, एटीएम धारकांना बोलण्यात गुंतवून, त्याच्या एटीएम कार्डचा पिन नंबर पाहून, हात चालाखीने कार्ड बदलत. त्यानंतर एटीएम धारकाचे पैसे काढत. या टोळीवर पालघरमध्ये तीन, ठाण्यातील मुंब्रा येथे एक आणि नागपूर ग्रामीण मध्ये एक असे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.