पालघर-योगेश चांदेकर
पालघरः टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवक आणि पोस्टमनची नोकरी लावण्याचा नावाखाली एकाने तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालून त्यांची फसवणूक केली. संबंधितांना दिलेल्या नोकरीच्या ऑर्डरही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
टपाल खाते केंद्र सरकारच्या खात्यात येते. त्यात प्रत्येक विभागात टपाल अधीक्षकाला नोकरी देण्याचे अधिकार असतात. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांची भरती संबंधितांना बारावी व पदवीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे होत असते. टपाल खात्यात उपडाकपाल, पोस्टमन, सहाय्यक, टपाल निरीक्षक अशी वेगवेगळी पदे असतात, तर ग्रामीण भागात खातेबाह्य कर्मचारी असतात. त्यांची नियुक्ती ही मुख्य टपाल कार्यालयातील टपाल अधीक्षकांमार्फत होत असते. टपाल खात्याच्या बँकेतही अशा प्रकारे नोकर भरती होत असते.
बनावट नियुक्तीपत्रे
ज्ञानेश्वर दिगंबर पाटील उर्फ रोहित पाटील (रा. रॉयल रेसिडेन्सी, आंबेडकर नगर, मनोर) याने वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांना टपाल खात्यातील नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांची नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली. ही नियुक्ती पत्रे देताना टपाल खात्याच्या विहित पत्रांचा अवलंब करण्यात आलेला नाही; परंतु बेरोजगार तरुणांना टपाल खात्यातील नोकरी कशी मिळते आणि त्यासाठी नियुक्ती पत्राचे नमुने काय असतात याची माहिती नसल्यामुळे ते या प्रकरणात फसले गेले.
अस्तित्वात नसलेल्या पदांचा नियुक्तीपत्रासाठी वापर
प्रत्येक तरुणाकडून नोकरीसाठी किमान एक लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले. काही वेळा ज्ञानेश्वर पाटील स्वतः संबंधित युवकाबरोबर टपाल कार्यालयात गेले. संबंधित युवकाला बाहेर ठेवून ज्ञानेश्वर पाटील आत गेला. त्यानंतर त्याने संबंधित युवकाला आत पाठवून तो मात्र गायब झाला. त्याने मिरा रोड व ठाणे विभागाचा टपाल कार्याच्या पत्त्याचा वापर केला. महाराष्ट्र टपाल सहायक अधीक्षक असे टपाल खात्यात कोणतेच पद नसताना या पदाच्या नावाने संबंधितांना नोकरीच्या ऑर्डर दिल्या. त्यावर ब्रँच पोस्ट मास्टर पालघर म्हणून सही ठोकण्यात आली. वास्तविक छोट्या गावातसुद्धा ब्रँच पोस्ट मास्टर हे पद नसते, तर प्रत्येक टपाल कार्यालयात एसपीएम म्हणजे उपडाकपाल हे पद असते आणि त्यांना नियुक्तीचे काहीही अधिकार नसतात.
शासकीय मुद्रेचा गैरवापर
पाटील याने मात्र या पदाच्या नावाचा गैरवापर केला. केंद्र सरकारची शासकीय मुद्रा वापरून तसेच ‘इंडिया पोस्ट बँके’चा लोगो वापरून तशी लेटर पॅड बनवण्यात आली. त्यावर पोस्ट मुंबई विभाग असे नमूद करण्यात आले. वास्तविक टपाल खात्यात टपाल निरीक्षक असे पद असते. टपाल खात्यात विभाग वगैरे नसतो, तर मुख्यालये असतात आणि राज्याचे ‘पीएमओ’ मुंबईत असतात. ‘पीएमओ’ म्हणजे पोस्टमास्टर जनरल हे पद भारतीय प्रशासकीय सेवेतील पदाच्या समक्ष असते. असे असताना टपाल खात्यातील कामाची कोणतीही माहिती नसताना केवळ बनावट लेटर पॅड आणि बनावट शिक्के वापरून युवकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. प्रत्यक्षात त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत.
फसवणूक आणि मनस्ताप
नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मनोर पोलिसांनी याप्रकरणी टपाल अधीक्षकांकडे याप्रकरणी माहिती मागवली आहे. टपाल अधीक्षकांकडून मिळालेल्या माहितीनंतर संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याची शक्यता आहे. पैसे तर गेलेच; शिवाय वाट्याला मनस्ताप आल्याने हे युवक उद्गिग्न झाले आहेत.