3 ऑगस्टच्या आगमनानंतर रविवारी (दि.10) देखील मुंबईतील 10 मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी अवघी मुंबापुरी दुमदुमली. यात मुंबईचा सम्राट (खेतवाडी), मुंबईचा महाराजा (खेतवाडी), अखिल चंदनवाडी, परळचा महाराजा, करीरोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, परळचा सम्राट, माझगावचा मोरया, खेतवाडीचा चिंतामणी, ताडदेवचा राजा या मोठ्या गणेश मंडळांसह इतर अनेक छोट्या-मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन झाले.
अनेक मोठ्या मूर्तिकारांचे कारखाने लालबाग परळमध्ये असल्याने रविवारी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. बाप्पांचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी भाविकांसह रील्सबाजांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
या सर्व मोठमोठ्या गणेश मूर्त्यांमध्ये अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या हातात टाळ आणि गळ्यात तुळशी माळा असलेली विठ्ठलाच्या रूपातील 26 फूट उंच गोडगणपतीची चर्चा जोरदार रंगली होती. असंख्य भक्तांचा जनसागर यावेळी श्रींच्या आगमनासाठी लोटला होता. अखिल चंदनवाडी मंडळ यंदा 48 वे वर्ष थाटामाटात साजरे करत आहे. यंदा विठ्ठल आणि पुंडलिकाच्या कथेवर आधारित पांडुरंगाच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात आली असून मंडळाने पंढरपूर मंदिराची प्रतिकृती आणि वारकर्यांच्या रिंगण सोहळ्यावर आधारित देखावा उभारल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुनील दर्गे यांनी दिली.
चंदनवाडीचा 26 फूट उंच गोडगणपती
चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाची मूर्ती दरवर्षीच लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असते. यंदादेखील ही 26 फूट उंच भव्यदिव्य मूर्ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. लालबाग परळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार कला गंध आर्टचे सर्वेसर्वा सिद्धेश दिघोळे यांनी ही भव्यदिव्य गोडगणपतीची मूर्ती साकारली आहे.