पालघर-योगेश चांदेकर
पालघरः सरकारी सेवेत असताना डॉक्टर आपली सेवा बजावत असतात. त्याचबरोबर सामाजिकतेचे भान त्यांना असते. एरव्ही उठसूठ सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना त्यांच्या संघटनेच्या सामाजिक बांधिलकीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालघर येथील महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्यात आला. या शिबिरात ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पालघरमधील महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. सरकारी नोकरी आणि अन्य जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम ही संघटना राबवत असते. त्यातूनच डॉक्टर दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रुग्णसोयी आणि जागरुकतेवर भर
गेल्या काही दिवसांपासून पालघरसह राज्यात रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यावर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला पालघरमधील सर्वच वैद्यकीय अधिकारी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिला. रक्तदान आणि रक्तदानाविषयी या वेळी जागृती करण्यात आली.
यांचा पुढाकार
या वेळी पालघर राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. रितेश पटेल, कार्याध्यक्ष डॉ. तन्वीर शेख, सचिव डॉ. भाऊसाहेब चत्तर, जिल्हा चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लोहारे, तलासरी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, वाडा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरयू तुपकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. अजय ठाकरे यांच्यासह आरोग्य विभागाच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यात भाग घेतला.
कोट
‘सरकारी सेवेत असलो, तरी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वच राजपत्रित वैद्यकीय अधिकारी काम करत असतात. समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून आम्ही सर्वच वैद्यकीय अधिकारी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आता पालघर येथे राबवण्यात आलेला उपक्रम हा त्यातील एक भाग होता. सध्या राज्यात रक्ताची टंचाई हा गंभीर प्रश्न असून या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला.
डॉ. तन्वीर शेख, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, पालघर
कोट
‘पालघर येथील महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना सातत्याने सामाजिक चळवळीशी बांधिलकी ठेवून काम करीत आहे. सरकारी सेवेत असलो, तरी ती करताना समाजासाठी आणखी काहीतरी करावे असा संघटनेचा कायम प्रयत्न असतो. त्यातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात.
डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक, पालघर