पालघर-योगेश चांदेकर
भावीन कंसारा यांच्याकडे भाजपचे पालघर शहराध्यक्षपद
तरुणाला नेतृत्व सिद्ध करण्याची संधी
पालघरः मोठ्या राजकीय कुटुंबातील किंवा मोठ्या संस्थातील पदाधिकाऱ्यांकडे राजकीय पदे चालून येतात; परंतु सामान्य कुटुंबातील व्यक्तीकडे मात्र राजकीय पद कधीच येत नाही. त्याला अपवाद भाजपच्या पालघर शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेले भावीनं कंसारा हे आहेत.
भावीन कंसारा हे अतिशय सामान्य कुटुंबातील. त्यांची परिस्थिती बेताची. प्रतिकूल परिस्थितीत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत असताना त्यांना राजकीय पक्षाचे काम करण्याची गोडी लागली. भाजप हेच त्यांच्यासाठी आवडीचे ठिकाण होते. त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मोठा प्रभाव आहे.
परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती
परिस्थिती कशी असली, तरी अंगी संघटनात्मक कौशल्य असले, तर पद आपोआप चालून येते. भावीन कंसारा हे त्याचे उत्तम उदाहरण. छोट्या पदाने राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली, तरी संघटन चातुर्य, कौशल्य आणि पक्षावर अतूट निष्ठा असेल तर आपोआप पदे चालत येतात, हा अनुभव भावीन यांना आहे. त्यांच्याकडे पालघर शहरात बूथ कमिटी अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, युवा मोर्चा शहराध्यक्ष अशी पदे चालत आली. या पदांना त्यांनी न्याय दिला.
चव्हाण यांनी हेरला हिरा
पालघरचे पालकमंत्री असताना रवींद्र चव्हाण यांची त्यांच्यावर नजर गेली. चव्हाण यांनीच त्यांच्यावर मोठ्या विश्वासाने अनेक पदे सोपवली. घराणेशाही किंवा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना भावीन यांच्यावर चव्हाण यांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली. चव्हाण यांनी त्यांना ताकद दिली. समर्थन दिले आणि काम करण्याची संधीही दिली. या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. संघटनात्मक बांधणी केली. मागच्या सर्व पदांना त्यांनी दिलेला न्याय आणि पक्षासाठी त्यांनी घेतलेले कष्ट लक्षात घेऊन आता पक्षाने त्यांच्यावर पालघर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात पालघर शहरात पक्षाची बांधणी करून युवकांना पक्षाशी अधिकाधिक जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
कोट
‘कोणतीही राजकीय पार्श्वभूमी माझ्याकडे नव्हती. माझे घराणेही मोठे नव्हते. अतिशय सामान्य कुटुंबातून असून सुद्धा मला पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली. आता त्यांनी माझ्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ती मी निष्ठेने, इमाने इतबारे आणि नेतृत्वाच्या अपेक्षेप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन. व सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रीत पणे काम करेन
भावीन कंसारा, नवनिर्वाचित शहराध्यक्ष, भाजप, पालघर