पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालर लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, पृष्ठभागही उखडला आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती, नूतनीकरण करण्याबरोबरच अन्य मागण्यांही खा. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त खा. सवरा दिल्लीत असून, त्यांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या रस्त्याची अत्यंत खराब व धोकादायक स्थिती लक्षात घेता यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी खा. सवरा यांनी गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक संतप्त
घोडबंद-तलासरी महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दररोज हजारो वाहनचालक, विद्यार्थी व नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. रस्त्याची ही परिस्थिती अपघातांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी
खा. डॉ.हेमंत सवरा यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने घोडबंदर ते तलासरी रस्त्याचे तात्काळ पुनर्भरण करावे, रस्त्याच्या कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण करावे, दोषी ठेकेदार व अंमलबजावणी यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, नियमित देखभाल व खड्डे तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
‘फूट ओव्हरब्रीज’ची मागणी
खा. सवरा यांनी खानिवडे (वसई) व आंबोली (तलासरी)या गावांमध्ये महामार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातात अनेकांचे बळी जात आहेत. त्यामुळे प्रत्येकी एक ‘फूट ओव्हरब्रीज मंजूर करून त्याचे तातडीने बांधकाम सुरू करण्याची मागणी केली आहे.
कोट
‘ही कामे पूर्ण झाली तर स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. त्याचबरोबर घोडबंदर-तलासरी राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही कमी होईल.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर