पालघर-योगेश चांदेकर
ग्रामपंचायत सदस्याचा पतीच डाटा एन्ट्रीऑपरेटर
ग्रामसेवकासह ग्रामपंचायत सदस्यांचा पाय खोलात
वाघाडी ग्रामपंचायतीचे अनेक गैरप्रकार उघड होण्याची शक्यता
पालघरः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालूक्यातील वाघाडी ग्रामपंचायतीत आता नवनवे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. ग्रामपंचायत सदस्य किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाइकाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणताही आर्थिक फायदा घेता येत नाही. असे असताना ग्रामपंचायत सदस्याच्या निवडीनंतर तिचा पतीच डाटा एन्ट्री ऑपरेटर झाल्याने या ग्रामपंचायतीत गैरप्रकार घडण्याची भीती आहे.
बजाज फायनान्स कंपनीकडून संदीप बसवत याने एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता त्याने ‘बजाज फायनान्स’ ची फसवणूक करण्यासाठी स्वतः स्वतःचा मृत्यूचा दाखला बनवला. १८ मे रोजी संदीपचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आणि त्याच्या मृत्यूचा दाखला १२ जूनला देण्यात आला. त्यावर डिस्पॅच क्रमांकासह अन्य सर्व माहिती आहे. या मृत्यूच्या दाखल्यावर ग्रामसेवकाची सही करण्यात आली आहे. आता ही सही आपली नसल्याचे ग्रामसेवक विजया हांडवा या सांगत असल्या, तरी यातून त्यांचा निष्काळजीपणा कसा आहे तो दिसून येत आहे
चौकशीच्या आदेशानंतर धावपळ
बजाज फायनान्स कंपनीने केलेल्या चौकशीनंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांची धावपळ उडाली. त्यांनी पोलिसांकडे पत्र दिले. या सर्व प्रकाराची आता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले असताना आता या ग्रामपंचायतीतील आणखी गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
निवडून आल्यानंतर सदस्यपती डाटा एन्ट्री ऑपरेटर
ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला डाटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी देण्यात आली. वास्तविक ग्रामपंचायत सदस्याला अन्य कोणतेही लाभ घेता येत नाहीत किंवा त्याच्या नातेवाइकालाही असे लाभ घेता येत नाहीत. असे लाभ घेतल्यास संबंधितांचे सदस्यत्व रद्द केले जाते. असे असताना गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या पतीची डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करता येते, असे सांगून त्यांची पाठराखण केली आहे.
कागदपत्रांची शहानिशा न करताच दाखला
वास्तविक ग्रामपंचायतच्या डाटा एन्ट्री ऑपरेटरसारख्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्याकडे लॉगिन आणि पासवर्ड असला, तरी कोणतेही प्रमाणपत्र, दाखला देण्याअगोदर कागदपत्रांची शहानिशा करावी लागते. दाखला तयार झाल्यानंतर त्याचा ओटीपी ग्रामसेवकाला आल्यानंतर त्याच्या मान्यतेनंतरच दाखला तयार करून तो देण्याची ग्रामपंचायत पद्धत असताना वाघाडी ग्रामपंचायत मात्र या कुठल्याच प्रकारचा अवलंब केला नाही असे दिसते.
लॉगिन आणि पासवर्ड का बदलला नाही?
ग्रामपंचायतीत डाटा एन्ट्री ऑपरेटर बदलला, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉगिन आणि
पासवर्ड बदलायला हवा; परंतु तसे केले नाही. केवळ एखादा बोगस दाखला दिला म्हणून नव्हे, तर वाघाडी ग्रामपंचायतीत असे अनेक प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायत सदस्याचा पतीच डाटा एन्ट्री ऑपरेटर असेल, तर तो त्याच्या प्रभागातील लोकांना कोणतेही दाखले बनवून देऊ शकतो.
वाघाडी ग्रामपंचायत संशयाच्या भोवऱ्यात
आता जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असताना गटविकास अधिकाऱ्यांनी या ग्रामपंचायतीची चौकशी करण्यास मदत करण्याऐवजी ते मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावरून दिसते. वाघाडी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी होणे गरजेचे असून दप्तर तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात आता ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामपंचायत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.