पालघर-योगेश चांदेकर
पालघर/जव्हार : ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी असते. आता वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळत असतो. सरपंच अभ्यासू नसल्यास या निधीचा विनियोग व्यवस्थित होत नाही तसंच गावाचा विकास रखडतो; परंतु कल्पेश राऊत यांच्यासारखा सरपंच असेल, तर तो गावाच्या विकासाला दिशा देतो आणि सर्वंगीण विकासाबरोबरच गावातील स्थलांतर थांबत.

सरकारनं गेल्या काही वर्षांपासून गावाच्या विकासासाठी वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना देण्याऐवजी थेट ग्रामपंचायतला देण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी सरपंचांची मोठी जबाबदारी असते. त्याचं कारण आता सरपंच थेट जनतेतून निवडून जात असतात. त्यामुळं सदस्य सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागत नाही. लोकनियुक्त सरपंच असेल, तर तो त्याच्या ग्रामविकासाच्या कल्पना व्यवस्थित राबवू शकतो. हे काम कासटवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश राऊत यांनी करून दाखवलं आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारनं त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून बोलवलं होतं. कासटवाडी ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला. राऊत हे जनतेला तसंच ग्रामपंचायत सदस्यांनाही विश्वासात घेऊन काम करत असतात. गावाच्या विकासाला गती मिळावी, कामात पारदर्शकता यावी, यावर त्यांचा सतत भर असतो. सर्वांना विश्वासात घेतलं, तर कामात अडथळे येत नाहीत आणि पारदर्शकता असेल, तर लोकांचीही कामाला साथ मिळते. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट गावाला मिळू लागल्यानंतर पंचायत समितीची तांत्रिक मदत घेऊन त्यांनी गावाच्या अनेक प्रश्नांसाठी निधी मिळवून आणला आहे सरपंचपदाची निवड ही आपल्या प्रतिष्ठेची नाही, तर गावाच्या विकासासाठी आहे हे समजून घेऊन त्यांनी गावात अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात पिण्याचं आणि शेतीचं पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, दळणवळणाची साधनं लोकांना उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
रोजगारानिमित्त गावातील स्थलांतर थांबवणं, गावातील दारिद्र्य दूर करणं आदी कामांवर त्यांनी भर दिला आहे. सरपंच हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत एक महत्त्वाचा दुवा असतो. या संस्थांशी चांगला संपर्क असलेले सरपंच ग्रामविकासाच्या अधिकाधिक योजना पदरात पाडून घेत असतात तसंच लोकप्रतिनिधींशी चांगला संपर्क असेल, तर त्यांच्या निधीचाही विनियोग गावातील वेगवेगळ्या कामांसाठी करता येतो. त्यामुळं अभ्यासू सरपंच असेल, तर गावाला तो पुढं घेऊन जातो. कल्पेश राऊत यांच्या बाबतीत तसंच घडलं आहे. सरपंचांना चांगले अधिकार मिळाले असल्यानं या अधिकाराचा वापर करण्याचं ज्ञान त्यांच्याकडं असलं पाहिजे.
राज्यात जी गावं वेगवेगळ्या अभियानात पुढं आली, तिथल्या सरपंच आणि ग्रामसेवकात चांगला समन्वय असल्यानं ते शक्य झालं. सरपंच काय करू शकतो, हे वेगवेगळ्या गावांनी दाखवून दिलं. पोपटराव पवार यांच्यासारखं नेतृत्व हिवरे बाजारातील कामातून उभं राहिलं. कल्पेश राऊत यांचं नेतृत्वही गावातील कामातून उभं राहत आहे. ग्रामसेवक तसंच पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क असल्यामुळं त्यांनी अनेक कामं मंजूर करून आणून ती प्रत्यक्षात मार्गी लावली आहेत. त्यासाठी त्यांना अन्य सदस्यांचं सहकार्य मिळालं आहे. गावात सरपंच अभ्यासू असला, तर ते लाभार्थींना थेट वेगवेगळ्या योजनांचा फायदा करून देतात. ग्राम विकासासाठी मिळालेला निधी हा ठेकेदारांच्या कल्याणासाठी नसतो, तर तो गावाच्या कल्याणासाठी असतो, हे लक्षात घेऊन राऊत काम करत असतात. केवळ आपण करतो, तेच खरं असं न मानता राज्यात इतर गावात कुठं काही चांगलं काम चालू आहे, त्या कामाची माहिती घेणं आणि त्या गावातील योजना कासटवाडीसारख्या ठिकाणी राबवणं यावर राऊत यांचा भर असतो. सरपंच एकदा निवडून आला, की त्याच्याकडून गावाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. त्यामुळं अपेक्षेच्या ओझ्याखाली न दबता गावातील कोणती कामं प्राधान्यानं करावीत, याचा एक आराखडा तयार करावा लागतो. असे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन राऊत यांनी गावाच्या विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. त्यासाठी नव्या जुन्या योजनांचा स्वतः अभ्यास करणं, ग्रामसेवकांनाही त्याबाबतीत विश्वासात घेणं, सदस्यांना योजनांचं महत्त्व पटवून देणं यावर राऊत यांनी भर दिला. महिला, अपंग, मागासवर्गीय, आदिवासी आदींच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या योजना प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं. अतिशय कमी काळात त्यांनी गावात केलेल्या विकास कामातून मिळून दिलेला रोजगार तसंच रोजगार हमी योजनेतून केलेली विविध विकासकामं, गल्लीबोळात पेव्हिंग ब्लॉक बसवणं, कॉंक्रिटीकरण करणं, शेताकडं जाणारे पाणंद रस्ते तयार करणं, अंगणवाडीची नवीन इमारत, रोजगार हमी योजनेच्या विविध योजना राबवणं यावर त्यांनी भर दिला. गाईंचे गोठे, पोल्ट्री शेड, शेत तलाव, शोषखड्डे, फळबाग लागवड, सामाजिक वनीकरण, सिंचन विहीर, तुती लागवड, सोनचाफा लागवड अशा अनेक प्रकारच्या कामातून त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास केला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून तसंच ‘पेसा’ व अन्य निधीतून गावात काही नवीन काम करता आली. त्यातून लोखंडी पूल, विहीर दुरुस्ती, विहिरीकडं जाणारे रस्ते,डिजिटल शाळा, अंगणवाडी दुरुस्ती, आरोग्य केंद्र दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, पथदिवे, वाचनालय, जिम, शाश्वत विकास, जुन्या तलावाचं खोलीकरण आणि सुशोभीकरण, पर्यटनाला चालना मिळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, नवीन बंधारे आदी कामं त्यांनी केली. गावातील शेती ओलिताखाली आणण्यामध्ये त्यांच्या योजनांचा मोठा फायदा झाला असून बारमाही पाणी उपलब्ध झालं. त्यामुळं शेतकऱ्यांना दुबार पिकं घेता आली. आदिवासीबहुल भाग असल्यामुळं कासटवाडी परिसरात दळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नीट नव्हते. त्यांनी गाव आणि लगतचे पाडे परस्परांशी जोडण्यासाठी रस्ते बांधले. विजेची सोय केली. ग्रामपंचायत हद्दीतील तलावामध्ये मासे सोडून त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीस हातभार लावला. ग्रामपंचायतमधील घरपट्टी, पाणीपट्टी आदींची थकबाकी वसुली केली. त्यामुळं लोकसभागातील विविध योजनांसाठी निधी उपलब्ध झाला. सरकारी इमारतींना सौरदिवे बसवणं, कूपनलिका, आदिवासी बहुउद्देशीय हॉल अशा अनेक योजना मार्गी लावण्यात आल्या. ग्रामस्थांना वनपट्टे मिळवून देण्यात आले. जलजीवन मिशन योजनेतून पाणी योजनेसाठी अडीच कोटी रुपये आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ४८ कोटी रुपयांची ‘जलजीवन मिशन’ची दुसरी योजना मंजूर करण्यात आली असून तिचं काम प्रगतीपथावर आहे. गावात जवळजवळ दहा कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामं मंजूर आहेत. गावाच्या विकासासाठी अशा अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या. राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाला प्राधान्य दिलं. त्यामुळं गावाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करता आलं. कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांचा झंजावात सुरू आहे. रोजगार योजना व्यवस्था उपलब्ध केल्यामुळं शहराकडे होणारं स्थलांतर थांबलं आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ नऊ महसुली गावं आणि अकरा पाड्यांचा समावेश असून इथली लोकसंख्या पाच हजार ६३५ आहे. भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येचा विचार करता कासटवाडी ही जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून राऊत यांनी एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीसाठी विविध योजना राबवून सर्वच विभागांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये भांगरे पाडा येथे पंधराव्या वित्त आयोगातून अंगणवाडी इमारत, दगडी नालाबांध, घोगऱ्याची मेट येथे रस्त्याला साईड पट्ट्या, हाडे गावातील घाटपाडा येथे गटार व संरक्षण भिंत, धूमपाडा पुलाला लोखंडी ग्रील, कासटवाडीच्या अंगणवाडीची दुरुस्ती, कंपोस्ट खताचं पिट बांधणं अशी विविध विकासाची कामं त्यांनी मार्गी लावली आहेत. अभ्यासू सरपंच असेल, तर गावं कशी कात टाकतात आणि विकासाच्या मार्गावर कशी घोडदौड करू शकतात, हे राऊत यांच्या कामातून दिसतं.