banner 728x90

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल

banner 468x60

Share This:

आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, सणाच्या दिवशीच बळीराजावर चिंतेचे मोठे संकट ओढावले आहे.

धाराशिव: वाशी तालुक्यात गारांचा वर्षाव

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याला आज सायंकाळी ६ च्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. इंदापूर, खानापूर, तेरखेडा, वाशी, बोरी आणि गोलेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये उभी ज्वारी, गहू, हरभरा आणि काढणीस आलेला कांदा भूईसपाट झाला आहे. याशिवाय आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कलिंगड आणि पालेभाज्याही गारांच्या माऱ्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत.
जालना: शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत

जालना जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला. परतूर, मंठा, बदनापूर आणि जालना शहरात सायंकाळी ५ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून झोपडपट्टी भागातील नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने त्यांचे हाल झाले. गहू, हरभरा, मका यासह मोसंबी आणि केळीच्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
वाशिम आणि अर्धापूर: पिकांचे कंबरडे मोडले

वाशिम जिल्ह्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस ‘काळ’ ठरला आहे. येथे बिजवाई कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू आणि हरभरा गारांच्या माऱ्यामुळे जमिनीदोस्त झाला आहे.

अर्धापूर (नांदेड): अर्धापूर तालुक्यातील चाबरा शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात पावसाने हजेरी लावल्याने पाहुण्यांची मोठी तारांबळ उडाली. हळद, गहू आणि हरभरा पिकांचे येथे मोठे नुकसान झाले आहे.
सांगली: पळशीच्या द्राक्ष बागायतदारांना तडाखा

सांगलीच्या खानापूर घाटमाथ्यावर निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. भिवघाट, हिवरे आणि पळशी परिसरात भीषण गारपीट झाली. पळशी हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ओळखले जाते. छाटणीसाठी तयार असलेल्या आणि काढणीवर आलेल्या द्राक्ष मण्यांना गारांमुळे तडे गेल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बळीराजाची मागणी: पंचनामे तातडीने करा

निसर्गाच्या या अवकृपेमुळे सणासुदीच्या काळात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. “दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहून आता जगायचे कसे?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!