पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हे दोन्ही पक्ष संयुक्त मोर्चा काढणार आहेत.
या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीत सामील असलेल्या शिवसेनेची (एकनाथ शिंदे गट) कोंडी झाल्याचे बोलले जात होते. भाजपचा (BJP) त्यांच्यावर दबाव असल्याच्या चर्चांना विराम देत, प्रथमच शिंदे गटाच्या एका मंत्र्याने या मोर्चाविषयी महत्त्वपूर्ण मतप्रदर्शन केले आहे.
शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी जळगाव येथे बोलताना म्हटले की, “पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) हे दोन्ही पक्ष मुंबईत संयुक्तपणे मोर्चा काढणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आमचा कोणाला विरोध थोडीच आहे. मराठी ही आमची भाषा आहे आणि ती आम्ही मान्य करतो.” हिंदीच्या बाबतीत सामूहिक निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ठाकरे गट आणि मनसेने महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाही काढण्यात येणार आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले असताना, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जळगावात आपले मत व्यक्त केले. मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाला विरोध नसल्याचे मांडतानाच हिंदीच्या बाबतीतही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, असे ते ( Gulabrao Patil ) म्हणाले.
दरम्यान, हिंदीच्या विरोधात राज्याचे वातावरण तापलेले असताना, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी “एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत?” अशी टीका केली होती. राऊत यांना प्रत्युत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकेरी भाषेत म्हटले की, “एकनाथ शिंदे हे तर तुझ्या छाताडावर बसले आहेत सोन्या.”
याचबरोबर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे राज्यातील शाळांमधील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याने ‘महाराष्ट्रद्रोहींचा जळफळाट झाला’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले होते. यावरही मंत्री पाटील यांनी खोचक टोला हाणला. “त्या महिला आहेत आणि माझ्या जिल्ह्याच्या आहेत. नाहीतर मी असे भारी उत्तर दिले असते ना, त्यांनी ( Gulabrao Patil ) विचारच केला असता,” असे पाटील म्हणाले. यावेळी मंत्री पाटील यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची राज्यात चर्चा सुरू असली तरी ते आताही एकत्रच असल्याचा दावाही केला.
















