पालघर-योगेश चांदेकर
अभियंता इंगळे यांच्या अन्य कारभाराच्या चौकशीची मागणी
पालघरः केळवा माहीम पाणीपुरवठा योजनेचे गेल्या एक वर्षापासून गायब असलेले पंप ‘लक्षवेधी’च्या बातमीमुळे परत आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून केळवे-माहीमसह १७ गावांना पाणीपुरवठा होत नव्हता. आता हे पंप आल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
दरम्यान, अभियंता प्रशांत इंगळे यांच्या काळात कोणतेही कंट्रोल पॅनेल न बसवता पाच लाख रुपयांचे बिल काढण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे?. केळवा-माहीम पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणला. ठेकेदाराशी संगनमत करून इंगळे यांनी पाच लाख रुपयांचे बिल काढले. एका कामातून दुसरे काम काढून त्यातून गैरप्रकार करण्याची ही साखळी आता उघड झाली आहे.
सप्टेंबर २०२३ रोजी पाठवलेले पंप दुरुस्त होऊन आले!
या योजनेच्या कंट्रोल पॅनलची दुरुस्ती झालीच नाही; शिवाय गेल्यावर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये या योजनेचे दोन पंप दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले होते. ‘लक्षवेधी’च्या बातमीने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी चौकशीसाठी उपअभियंता मिलिंद ठाकरे यांची नियुक्ती केली. त्यांनी प्रत्यक्षात केळवा-माहीम पाणी योजनेच्या कंट्रोल पॅनल स्टार्टर आणि अन्य यंत्रणेची पाहणी केली. तेथील नोंदवह्या तपासल्या. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला.
कागदोपत्री काम!
२०२१ नंतर केळवे-माहीम पाणीपुरवठा योजनेच्या कंट्रोल पॅनलचा स्टार्टर बसवला नसल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ केवळ कागदोपत्री तो बसवून पाच लाख रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे यांच्या चौकशीच्या वेळी केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप किणी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ठाकरे यांना या योजने संदर्भात काही प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली तसेच या चौकशी अहवालाची एक प्रत ग्रामपंचायतीला देण्याची मागणी केली.
योजनेची वेळेवर देखभाल दुरुस्ती नाही
एकीकडे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग जनतेकडून पाणीपट्टी स्वरूपात मोठी रक्कम वसूल करत असताना प्रत्यक्षात जनतेला वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही. दुरुस्तीच्या नावाखाली पंप वर्षानुवर्ष गायब राहतात. सतरा गावांचे नागरिक पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करतात. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यालाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. या योजनेची दुरुस्ती वेळेवर झाली असती, तर पाणीपुरवठ्यात अडचण आली नसती. अनेकदा योजनेतील यंत्रणांतील सुटे भाग मिळत नाहीत. वेळेवर सुट्टे भाग न मिळाल्याने तात्पुरती तडजोड करून कामे करावी लागतात असे या कर्मचाऱ्यांनी चौकशीच्या वेळी ठाकरे यांना सांगितले.
इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई अपेक्षित
दरम्यान, इंगळे यांनी केळवे-माहीम पाणी योजनेमध्ये जसा गैरव्यवहार केला, तसा वसई तालुक्यातील अन्य पाणी योजनांमध्ये केला आहे का, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील चौकशी करण्याची मागणी आता पुढे आली आहे. त्यांच्या काळात कोणकोणत्या योजनांची कामे झाली, कामे न करता काही बिले काढली गेली का, त्याची दप्तर तपासणी करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून, गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याची आवश्यकता आहे.