पालघर-योगेश चांदेकर
पालघरः राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांचा उपसरपंच लाभ घेत असून खरे लाभार्थी मात्र सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. पालघर जिल्ह्यात तर आणि ग्रामपंचायतीचे सदस्यांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले योजनेतील संदिग्धतेचा फायदा घेऊन लाटली आहेत. याबाबत चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना फायदा घेता येत नाही. लाभाच्या पदावर असताना योजनांचे लाभार्थी होता येत नाही; परंतु सरकारी नियमातील त्रुटीचा गैरफायदा घेऊन अनेक सरपंच, उपसरपंच आणि सदस्य केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना स्वतःच्याच घरात आणत आहेत आणि खरे लाभार्थी मात्र या योजनांपासून वंचित राहत आहेत.
गंजाडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना घरकुले मंजूर
डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचे उदाहरण बोलके आहे. उपसरपंचांनी स्वतःसह त्यांच्या नातेवाइकांनी पंतप्रधान निवास योजनेचा लाभ घेणे गैर नाही; परंतु एकाच कुटुंबातील अनेकांना या योजनांचा लाभ होत असताना खरे लाभार्थी मात्र त्यापासून वंचित राहत असतील, तर त्याबाबत मात्र निश्चित कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
पक्की घरे असताना लाभ
उपसरपंचासह अनेकांची पक्की घरी असताना त्यांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले पदावर असताना स्वतःसाठी मंजूर करून घेतली आहेत आणि कुडाच्या घरात राहणारे अनेक लाभार्थी पंतप्रधान निवास योजनेच्या घरकुलांपासून वंचित आहेत. वास्तविक पंतप्रधान निवास योजनेच्या घरकुलासाठी काही अटी आहेत. या योजनेच्या घरकुलांचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पाठवले, तरी पंचायत समिती स्तरावर त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता असताना ती शहानिशा न करता प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचे समोर येत आहे.
कुटुंब कल्याणाचा विचार
गंजाड ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी त्यांचा मोठा भाऊ, काका आणि चुलत भाऊ आणि स्वतःसाठी पंतप्रधान आवास योजनेची घरे मंजूर करून दिली. त्यापैकी काहींना अगदी पक्की घरे असल्याचे सांगितले जाते. विद्ममान सत्ताधाऱ्यांच्या काळात त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना एकाचवेळी घरे मंजूर होत असतील आणि त्याचवेळी अनेक गरजू लाभार्थी वंचित राहत असतील, तर संशय घ्यायला जागा उरते. दरम्यान याबाबत गंजाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना याबाबतची माहिती दिली असता त्यांनी सारवा सारव करत मला याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
चौकशी करावी लागेल
याबाबत पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी असे काही झाले असेल, तर त्याची चौकशी करावी लागेल असे स्पष्ट केले. दरम्यान पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांचा मात्र अशा घरकुलांना आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येते. गंजाड येथील उपसरपंच कौशल कामडी ठेकेदारी करीत असून ग्रामपंचायतीची कामे इतरांच्या नावे घेऊन स्वतःच करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पंचायत समिती स्तरावरून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
कोट
‘गंजाड ग्रामपंचायत उपसरपंच कौशल कामडी यांनी पदावर असताना पक्की घर असताना स्वतःसाठी, भावासाठी तसेच काका आणि चुलत भावासाठी ही पंतप्रधान आवास योजनेतील घरकुले मंजूर करून घेतली; शिवाय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीचे पाणी उपसरपंच स्वतःच वापरत असून त्याबाबत चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रारी दाखल आहेत.सदर उपसरपंच वादग्रस्त आहे.
श्रीधर वायडा, ग्रामस्थ गंजाड.