पालघर-योगेश चांदेकर
पालघरः ज्येष्ठ कवी विं. दा. करंदीकर यांची एक कविता आहे. ‘देणाऱ्याने देत जावे! घेणाऱ्याने घेत जावे! घेता घेता एक दिवस देणाऱ्याचा हात घ्यावा! असे या कवितेत म्हटले आहे. याचा अर्थ दातृत्वाचा आणि मदतीचा गुण झिरपत राहावा असा आहे. दातृत्व ही काही श्रीमंताची मक्तेदारी नाही. श्रीमंत असणाऱ्यांकडेही दातृत्व असतेच असे नाही. दातृत्व ही वृत्ती गरीबातही असते, याचा प्रत्यय डहाणू तालुक्यातील राई येथील दिलीप पटेल या तरुणाकडे पाहून येतो. श्रीरामांवर अगाध श्रद्धा असलेल्या दिलीपने आतापर्यंत एक हजार लोकांच्या हातावर ‘जय श्रीराम’ चा टॅटू मोफत काढून दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील राई या गावच्या दिलीपने अतिशय गरिबीत दिवस काढले. मोलमजुरी करून छोटेसे भांडवल जमा केले आणि त्यातून त्याने ‘ड्रीम टॅटू डहाणू’ या ब्रँडने व्यवसाय सुरू केला गेल्या तेरा वर्षांत त्याने वीस हजारांहून अधिक लोकांच्या हातावर टॅटू काढले आहेत
मनात श्रीराम कोरण्याचा यज्ञ
गेल्या वर्षभरापासून देशभरात अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू आहे. राम मंदिरासाठी वेगवेगळ्या भागातील लोक त्यांना झेपेल आणि जमेल तशी मदत करत असतात. हीच मदत करण्याची भावना दिलीप पटेल याच्या मनात निर्माण झाली. हिंदुत्वाचा जागर आणि श्रीरामांबद्दल लोकांच्या मनात भक्ती निर्माण करण्यासाठी गेल्या ऑगस्टपासून त्याने लोकांच्या हातावर मोफत ‘जय श्रीराम’चा टॅटू काढून देण्यास सुरुवात केली. हाताकडे पाहून त्यांच्या मनात आणि हृदयात कायम श्रीराम असावा, अशी त्याची भावना आहे.
पहाटेपासूनच श्रीराम कोरण्यास गर्दी
‘ड्रीम टॅटू डहाणू’ मार्फत त्याचे हे काम सुरू आहे. दर मंगळवारी आणि शनिवारी तो लोकांच्या हातावर टॅटू काढून देत असतो. तो सकाळी नऊ वाजता दुकानात येतो. त्यापूर्वीच वीस-तीस जण पहाटेपासून त्याची प्रतीक्षा करत असतात. आलेल्या सर्व लोकांच्या हातावर ‘जय श्रीराम’चा टॅटू काढेपर्यंत त्याचे काम थांबत नाही. श्रीरामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरही लोकांच्या हातावर ‘जय श्रीराम’चा टॅटू काढण्याचे काम तो सुरूच ठेवणार आहे.
टॅटू काढल्यानंतरचे समाधान हाच मोठा पुरस्कार
दिलीप पटेल याची हिंदू धर्मावर अगाध आणि अपार श्रद्धा आहे, ती इतरांच्या मनात रुजावी, असा त्याचा प्रयत्न आहे. त्याला आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि जागतिक स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत; परंतु ‘जय श्रीराम’चा टॅटू हातावर काढल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच सर्वाधिक सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे त्याला वाटते.