बुलढाणा जिल्ह्यात प्राप्तिकर विभागाने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने जिल्ह्यातील सुमारे १,०५० पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्तिकर नोटिसा बजावल्या आहेत.
त्यांच्यावर बनावट गुंतवणूक आणि कपात दाखवून करचोरीचे गंभीर आरोप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन ते चार वर्षांतील त्यांच्या आयकर विवरणपत्रांची तपासणी केल्यानंतर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी कलम ८० क अंतर्गत बनावट गुंतवणूक आणि कपात आणि गृहकर्ज व्याज सूट दाखवून करसवलत मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटंटद्वारे दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे संगनमताचा संशय निर्माण झाला आहे. अनेक प्रकरणांमध्ये विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृहकर्जासाठी कोणतेही खरे दावे नव्हते, तरीही मोठ्या प्रमाणात कपात दाखवण्यात आली होती, अशी माहिती आयकर विभागाच्या तपासात समोर आली. या कारवाईनंतर, बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कडक भूमिका घेतली आहे. सर्व पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या आयकर रिटर्नची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिस अधीक्षक कार्यालयाला नोटीस
चूक आढळून आलेल्या कोणालाही १० नोव्हेंबरपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करावे, अन्यथा विभागीय चौकशी सुरू केली जाईल, असे पोलिस अधिक्षकांनी सांगितले. जर आयकर विभागाने कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा खटला सुरू केला तर त्याची जबाबदारी संबंधित पोलिस अधिकारी किंवा अधिकाऱ्याची असेल, असे तांबे यांनी स्पष्ट केले. आयकर विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला नोटीस बजावली आहे.
















