banner 728x90

रोटरी क्लबच्या ‘बळा’वर जतीनने घेतली ‘भरारी’, ग्रामीण भागातील ‘अष्टपैलू हिऱ्यांना’ हवा कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मदतीचा हात

banner 468x60

Share This:

पालघर – योगेश चांदेकर

योग्यवेळी मदतीचा हात आणि प्रोत्साहन मिळाल्यावर जिद्दीने घेतलेली भरारी निश्‍चितच यशस्वी ठरते. याचीच प्रचिती डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथील जतिन शिवदास दवणे याने दाखविली आहे. रोटरी क्लब ऑफ डहाणूने केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्याने राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.

banner 325x300

पित्याचे छत्र हरपलेल्या आणि कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असलेला शालेय विद्यार्थी जतीन हा धावणे या क्रीडाप्रकारात अत्यंत ‘चपळ’ आहे. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्यानंतर जतीनची राष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी (नॅशनल लेव्हल स्कूल स्पोर्टस्‌‍ चॅम्पियनशीप) निवड झाली. ही स्पर्धा जयपूर येथे होणार होती. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तिथे जाण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे त्याला अशक्य झाले. अखेर एका व्यक्तीने त्याला आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र, नंतर ऐनवेळी त्या व्यक्तीने जतीनला मदत करण्यास नकार दिला. यामुळे खचलेल्या जतीनने रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या सदस्या किर्ती मेहता यांना भेटून समस्या सांगितली. त्याला धीर देऊन मेहता यांनी त्वरित रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष संजय कर्नावट, सचिव विपूल मिस्त्री, नगरसेवक राजू माच्छी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर काही तासांतच या सर्वांकडून आवश्‍यक असलेली मदतीची रक्कम जतीनला देण्यात आली. या मदतीमुळे जतीनला मोठे बळ मिळाले आणि स्पर्धेसाठी तो सज्ज झाला.

दोन फेब्रुवारी रोजी सकाळी जतीन दवणे हा जयपूरच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी तिथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जतीनने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले. डहाणू येथे परतल्यानंतर जतीनने रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या सदस्यांची भेट घेऊन भावूक होत त्यांचे आभार व्यक्त केले. आपल्या यशात सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक कर्तृत्ववान आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र, अंगी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाची तयारी असतानाही केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना स्पर्धांपासून मुकावे लागते. स्वतःमधील कौशल्य दाखवत आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनाही आर्थिक पाठबळाची अत्यंत आवश्‍यकता आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी अशा खेळाडूंना आर्थिक मदतीचे बळ दिल्यास त्यांनाही यशस्वी भरारी घेता येईल. ग्रामीण भागातील या ‘अष्टपैलू हिऱ्यांना’ योग्यवेळी मदतीचा हात मिळाल्यास जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होईल, अशा प्रतिक्रिया या क्षेत्रातील व्यक्तींकडून व्यक्त होत आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!