पालघर-जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांमधील नागरिकांना, सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ जव्हार एसटी आगाराचा आधार आहे. जव्हार एसटी आगारातून गाव खेड्यापासून ते वेगवेगळ्या शहरांकडे जाण्यासाठी एसटी बसच्या फेऱ्यांचे नियमन करण्यात आले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून या बसची दुरावस्था झाली आहे. अनेक बसेसच्या खिडक्या, खुर्चा (आसने) तुटलेल्या आहेत. गळकी छप्परे तर कधी खालील बाजूने पावसाचे पाणी गाडीत येत आहे. वेळेत बस न येणे, प्रवासादरम्यान मध्येच बस नादुरुस्त होण्याचे तसेच टायर पंक्चर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
आदिवासी ग्रामीण भागातील दळणवळणात, एसटी महामंडळाच्या लालपरीची महत्त्वाची भूमिका आहे. गाव खेड्यापाड्यापर्यंत लालपरी धावते आहे. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी एकमेव जव्हार एसटी आगाराच्या बसेसचा आधार आहे. जव्हार आगारातून गावखेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी मानव विकास
कार्यक्रमांतर्गत बससेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवासाची हमी दुरावली आहे. जव्हार आगारात एकूण ५६ बसेस ३८ बस प्रवाशांसाठी तर १८ बस मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आहेत
डेपोतून वेळेत बस सुटत नाही. बहुतांश बसेस ह्या कालबाह्य झाल्याने त्यांना खिडक्या नसणे , काचा तुटलेल्या असणे, गळक्या बसेस झाल्या आहेत. अनेक बसेसमधील सीट तुटलेल्या आहेत. बसच्या खालच्या बाजूने पाणी प्रवाशांच्या अंगावर येते. अनेक बस रस्त्यातच नादुरुस्त होत आहे. पंक्चर होत आहे. पंक्चर टायर काढण्यास सर्वच बसेसमध्ये अवजारे नाही. स्टेपनी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे प्रवाशांना, तेथेच उतरवून मागून येणाऱ्या, दुसऱ्या बसमध्ये बसण्याची व्यवस्था कंडक्टरला करावी लागते.
एस टी प्रवाशांना होणारा मनस्ताप सोडवण्यासाठी तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यांच्याकडे जव्हार एस टी आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.पारस सहाणे यांनी केली होती.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पालघर विभागात प्रथम जव्हार आगाराला प्राधान्य देऊन १० नव्याकोऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या डिझेल बसेस जव्हार आगाराला प्राप्त झाल्या असून जव्हार गावातील नागरीक मोठ्या उत्साहात असुन त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र सरकारला आणि सहाणे यांना धन्यवाद दिले आहेत
कोट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचे आभार. आदिवासी बहुल जव्हार आगाराला नवीन १० बसेस उपलब्ध झाल्या असून आणखी बसेस येत्या काळात येणार आहेत.
ॲड.पारस सहाणे,
सामाजिक कार्यकर्ते.
नवीन बसेस उपलब्ध झाल्याने चांगली सेवा प्रवाशांना देता येईल आणि प्रवाशांना गैरसोय होणार नाही.
–योगेश करमरकर , वाहतूक नियंत्रक