पालघर-योगेश चांदेकर
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून यात्रेकरूंची अडवणूक
महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ता बंद
अधिकाऱ्यांची बेजबाबदारपणाची उत्तरे
पालघरः डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील महालक्ष्मीची यात्रा पंधरा दिवस सुरू असते. या यात्रेला लाखो भाविक येत असतात; परंतु ऐन यात्रेच्या काळातच या देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कमान उभारण्याचे काम सुरू असून हा रस्ता बंद करून ठेवल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. त्याबाबत संतापही व्यक्त केला जात आहे.
पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील महालक्ष्मीचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी गुजरातपासून मुंबईपर्यंतचे भाविक येत असतात. पंधरा दिवस येथे यात्रा भरते. लाखो भाविक यात्रेला येत असताना त्यांची सोय होऊ नये याकरिता प्रशासन दोन-तीन महिने अगोदरपासून तयारी करीत असते, तशी तयारी या वर्षीही करण्यात आली. त्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, महसूल प्रशासन, पोलिस आदींची संयुक्त बैठक घेतली जात असते. तशी बैठक या वर्षीही घेण्यात आली.
यात्रेच्या काळातच कमान उभारणी
विशेष म्हणजे या बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम विभाग डहाणूचे उपअभियंता मुकुंद डाबेराव उपस्थित होते. असे असताना नेमके यात्रेच्या काळातच महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमान उभारणीचे काम सुरू आहे. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कमान बांधणीसाठी मुख्य रस्ता बंद केल्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
एक वर्षांपूर्वी काम मंजूर
विवळवेढे येथे महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार बांधण्यास एक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. गेल्या एक वर्षांपासून या कमानीच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. गेल्या वर्षी कमानीच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला; परंतु ठेकेदाराने वर्षभरात काहीच काम केले नाही. डहाणू पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने मागील वर्षी निविदा मंजुरी आणि कार्यारंभ आदेश देण्यापलीकडे कामाला गती मिळावी, यासाठी कोणतीही प्रयत्न केले नाहीत. कार्यारंभ आदेश देऊन एक वर्ष झाला, तरी कामाला सुरुवात झाली नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदाराला नोटीसा देण्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.
जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न
शाखा अभियंता प्रशांत फुलेवार आणि उपअभियंता मुकुंद डाबेराव पूर्वीच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानत आहेत. वास्तविक यात्रेच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन एकतर यात्रेच्या अगोदर काम करणे अपेक्षित होते किंवा यात्रा झाल्यानंतर काम करणे अपेक्षीत असतांना संबंधित ठेकेदार यांनी पंधरा दिवस अगोदर कमानीचे बांधकाम सुरू केले. सुमारे दहा लाख रुपये खर्चाची ही कमान काँक्रीटमध्ये असून त्यासाठी संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला आहे. कमानी दिलेला आधार कोसळला, तर त्याला जबाबदार कोण आणि यात्रेच्या काळात दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी कोणावर असे प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
कार्यालयात आल्यानंतरच माहिती देऊ
याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग डहाणूचे शाखा अभियंता प्रशांत फुलेवार यांच्यांशी संपर्क साधला असता कार्यालयात या माहिती देतो, अशी उत्तरे देऊन त्यांनी चालढकल केली, तर उपअभियंता डाबेवार यांनी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली. ठेकेदाराने काम उशिरा सुरू केले. त्याला आम्ही काय करणार असे सांगत त्यांनीही मी जातो, करतो, पाहतो अशीच उत्तरे दिली. या प्रकरणात अभियंते ठेकेदारांना फक्त नोटीस देण्यात धन्यता मानीत असून कारवाईच्या दृष्टीने मात्र पाऊल मागेच आहे.
कोट
‘महालक्ष्मी देवीच्या कमानीसाठी दहा लाख रुपयांची निविदा मंजूर झाली. त्यानुसार गेल्या वर्षी कार्यारंभ आदेश देण्यात आला. वर्षभर काम सुरू होऊ शकले नाही. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी विरोध केला. आता काम अपूर्ण आहे. काही दुर्घटना घडली, तर त्याला शाखा अभियंता आणि उपअभियंता जबाबदार. त्यात काय एवढे?
मुकुंद डाबेराव, उप अभियंता, बांधकाम विभाग