पालघर: ज्या घटकांना या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हितासाठी काम करायचे नसेल त्यांनी आपल्या मंत्र्याला सांगून आम्हाला गणेश नाईक सोबत काम करायचे नाही, मला दुसरीकडे बदली द्या, असे सांगून निघून जावे.
मला काही प्रॉब्लेम नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी मांडताना अधिकाऱ्यांना सुनावले.
राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक विभागांतील प्रशस्तीपत्रकांचे वाटप नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, आदी उपस्थित होते.
८० टक्के कामांचा निपटारा
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कामकाजात ८० टक्के कामांचा निपटारा झाला आहे. सर्व विभागांतील अधिकाऱ्यांचे हे श्रेय असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जनता दरबारात सहमतीनेही प्रकरण निकाली निघतात आणि हेच जनता दरबाराचे यश असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.