पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीने १३ लाख पन्नास हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट काढले. काही खरेदी तसेच रंगरंगोटीपोटी ही बिले काढण्यात आली आहेत; परंतु प्रत्यक्षात शाळा व समाज मंदिराचे रंगकाम झाले नसताना ही बिले अदा केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे.
डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांनीच कासा ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता लक्षात आणून दिली आहे. मासिक बैठकीत तसेच ग्रामसभेत गावासाठी एलईडी आणि कचराकुंड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला होता त्यानुसार वसईच्या बालाजी एंटरप्राइजेस या फर्मला हे काम देण्यात आले. वास्तविक बालाजी एंटरप्रायझेशनाला पालघर जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायत आणि शाळांची कामे का दिली जातात हा पुन्हा एक संशोधनाचा आणि संशयाचा मुद्दा आहे
पुरवठादारालाच रंगकामाचा ठेका कसा?
कासा ग्रामपंचायतीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे बालाजी एंटरप्राजेसने ५२ कचराकुंड्या या ग्रामपंचायतीला पुरवल्या आहेत. या सोबतच एलईडी बल्बही पुरवले आहेत; परंतु सामान पुरवणाराच रंगकाम कसे करू शकतो, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पेंटर आणि पुरवठादार तरी वेगवेगळे असायला हवेत; परंतु कासा ग्रामपंचायतीच्या एकूण कारभाराबाबतच आता संशय घ्यायला जागा आहे आणि काही सदस्यांनीच आता त्याविरोधात आता आवाज उठवला आहे.
रंगकाम अपूर्ण तरी पैसे अदा
ग्रामपंचायती हद्दीतील समाज मंदिर आणि शाळांच्या रंगरंगोटीचे काम होण्याअगोदरच बालाजी इंटरप्रायजेसला संपूर्ण पैसे देण्यात आले. शाळेच्या रंगोटीच्या गुणवत्तेचा मुद्दा काही सदस्यांनी उपस्थित करून हे काम बंद पाडले, तरीही ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी या संस्थेला संपूर्ण कामाचे पैसे दिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या चौकशीतच ॲडव्हान्स बिले दिल्याचा तपशील उपलब्ध झाला आहे.
सरपंच म्हणतात, ‘चुकीचे काम’
याबाबत सरपंच सुनीता कामडी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी पाचलकर यांनी चुकीचे काम केले आहे. मला विश्वासात न घेताच पैसे काढले अशी सारवासारव सुरू केली आहे. कामडी यांना त्यांच्या सहीनीशी पैसे काढण्यात आल्याचे निदर्शनास आणताच त्यांनी सांगितले, की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे काढण्यासाठी माझी सही घेण्यात आली होती. ठेकेदाला देण्यासाठी हे पैसे काढण्यात आले याची मला माहिती नव्हती. असे असले, तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या खरेदीची बिले वेगळ्या निधीतून काढली जातात आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेगळ्या निधीतून काढला जातो. त्याची दोन स्वतंत्र खाती असतात. असे असतानाही सरपंचाची दिशाभूल करून निधी काढण्यात आल्याचे दिसते. याप्रकरणी आता ग्रामपंचायत सदस्यांनीच ऑनलाइन पैसे काढल्याचे पुरावे सरपंचांना दिले आहेत.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क नाही
ग्रामपंचायत अधिकारी पाचलकर यांनी अधिकाराचा कसा दुरुपयोग केला, याची तक्रार करण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत पाचलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. या कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आता त्याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कोट
‘शाळांच्या रंगरंगोटीचे काम सुरू होते; परंतु ते काम अजून पूर्ण झाले नाही. तरीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संबंधितांना पैसे दिले ही चूक आहे. ही चूक त्यांनाही मान्य आहे. याबाबत आता वरिष्ठांकडे तक्रार करू.
-सुनीता कामडी, सरपंच, कासा,
कोट
‘कासा ग्रामपंचायती संदर्भात मला सरपंच किंवा अन्य कोणाची तक्रार आली तर संबंधितांवर कारवाई करू.
पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, डहाणू