पालघर-योगेश चांदेकर
पालघरः प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय पोषण आहाराकरिता प्रत्येक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेला धान्य दिले जाते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवण्यासाठी हे धान्य दिले जात असून त्याच्या नोंदी शाळेने व्यवस्थित ठेवणे अपेक्षित आहे; परंतु अलीकडच्या काळात शालेय पोषण आहाराला पाय फुटले असून हे धान्य अनेक ठिकाणी बाजारात विकले जाते, अशा तक्रारी आहेत? डहाणू तालुक्यातील के. एल. पोंदा माध्यमिक विद्यालयाच्या शालेय पोषण आहारातही तफावत आढळली असून याप्रकरणी शिक्षण विभागाने या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नोटीस पाठवून म्हणणे मागवले आहे.
शालेय पोषण आहार संबंधित शाळांना वेळेवर दिला जातो की नाही, दिलेले धान्य योग्य प्रमाणात शिजवले जाते की नाही, याची पाहणी पंचायत समितीचा शिक्षण विभाग करत असतो. वास्तविक ही पाहणी आणि त्याच्या नोंदी केंद्रप्रमुखांनी करून तसा अहवाल पंचायत समितीला देणे अपेक्षित आहे.
शाळेच्या पाहणीत आढळली तफावत
या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी यांनी के. एल. पोंदा माध्यमीक विभागाच्या धान्य कोठाराची अचानक पाहणी केली असता त्यात आठ क्विंटल धान्य कमी आढळले. या शाळेचे साठाबुक तपासणी केली असता त्यातही मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे. या शाळेला जळगाव येथील साई फेडरेशनकडून धान्याचा पुरवठा केला जातो. प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही विभागांना हा धान्य पुरवठा केला जात असतो.
पोषण आहार देतानाही हात आखडता
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पहिली ते पाचवीच्या मुलांना शंभर ग्रॅम, तर पाचवी ते आठवीच्या मुलांना दीडशे ग्रॅम धान्य शिजवून देणे अपेक्षित आहे; परंतु के. एल. पोंदा विद्यालयात केलेल्या पाहणीच्या वेळी धान्याचा साठा कमी आढळला. दररोज सत्तर ते ऐंशी किलो धान्य विद्यार्थ्यांना शिजवून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३० ते ४० किलो तांदूळ शिजवला जातो, असे चौकशीच्या वेळी पंचायत समितीच्या तपासणी पथकासमोर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यातच या शाळेतील साठा नोंदवहीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. गोरगरीब आणि सर्वच समाज घटकांतील विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे, मात्र शाळेचे मुख्याध्यापक कमी धान्य शिजवायला सांगून विद्यार्थ्याच्या पोटचा घास हिरावून त्यांना उपाशी का ठेवत आहेत ? असाही प्रश्न उपस्थित होतो.
नोंदीच नाहीत
धान्य जर उशिरा आले, तर त्याची नोंद प्रत्यक्षात करायला हवी; परंतु अशा प्रकारची कुठलीही नोंद केली जात नाही? अन्य शाळेला धान्य दिले, तर त्याचीही नोंद केलेली नाही. डहाणू तालुक्यात एकूण ४९३ शाळा असून या शाळातील पन्नास हजार १५२ विद्यार्थ्यांना अडीच लाख किलो तांदूळ दर महिन्याला दिला जातो. दरम्यान, या प्रकरणी विस्तार अधिकारी यांनी शाळेला नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मागवले आहे.
मुख्याध्यापकाची परस्परविसंगत उत्तरे
दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक सोपान इंगळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी परस्पर विसंगत उडवाउडवीची उत्तरे देताना अकलेचे तारे तोडले. अगोदर तर त्यांनी असे सांगितले, की आमच्या शाळेला मिळालेच्या धान्याच्या नोंदी व्यवस्थित असून त्यात कुठेही तफावत नाही. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी चुकून नोंद झाल्याचे सांगितले. त्याबाबतचे म्हणणे आम्ही पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी नमूद केले. शाळेतील अन्न शिजवण्याच्या कमी प्रमाणाबाबत ते म्हणाले, की असा कोणताही प्रकार होत नाही. वास्तविक शाळेच्या पटसंख्येनुसार दररोज सुमारे ७० ते ८० किलो धान्य शिजवणे आवश्यक असताना मुख्याध्यापक इंगळे यांनी केवळ ३० ते ४० किलो धान्य शिजवण्याचे आदेश दिले?. म्हणजे दररोज पन्नास टक्के धान्य साठ्यात वाढ होते. मात्र धान्य साठ्यात वाढ होऊनही तब्बल ८०० किलो धान्य कसे कमी झाले? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
म्हणे, ‘दोनदा नोंदी!’
शाळेच्या पोषण आहाराच्या दोनदा नोंदणी झाल्यामुळे त्यात तफावत आढळते असे सांगितले. दोनदा नोंदणी झाली, तर धान्य जादा भरायला पाहिजे, असे निदर्शनास आणताच त्यांनी बाहेरच्या शाळेला धान्य दिल्याची सारवासारव केली. शालेय पोषण आहार दररोज नियमाप्रमाणे शिजवून दिला जातो. फक्त परीक्षेच्या काळात मात्र तीस ते चाळीस किलो पोषण आहार शिजवला जातो, तर अन्य वेळी सत्तर ते ऐशी किलो पोषण आहार शिजवला जातो, असे त्यांनी सांगितले.
पोषण आहारातच मिळते कमी धान्य
अन्य शाळेला दिलेल्या पोषण आहाराबाबत च्या नोंदी का नाहीत, असे विचारले असता यापुढे अशा नोंदी ठेवू, असे उत्तर त्यांनी दिले तसेच शालेय पोषण आहारात मिळणाऱ्या तांदळाच्या गोणीत नमूद केल्याप्रमाणे धान्य नसते, असा आरोप करताना ते कमी असते. आता आम्ही वजन काटा आणला आहे. त्यातून पोषण आहार मोजूनच घेऊ, असे ते म्हणाले. यापूर्वीच वजन काटा का आणला नाही असे विचारताच त्यांनी त्यावर उत्तर दिले नाही.
कोट
तपासणी दरम्यान धान्यात तफावत आढळली आहे जवळपास आठ क्विंटल तांदूळ कमी आढळला आहे याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.
राजुदास जाधव, विस्तार अधिकारी शिक्षण
कोट
‘के. एल. पोंदा विद्यालय नावाजलेले विद्यालय असून येथे मोठ्या प्रमाणात गोर गरीब विद्यार्थी शिकतात. तुम्हीही येथे शिकला आहात. त्यामुळे बातमी देऊ नका. पोषण आहार योजनेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.
-सोपान इंगळे, मुख्याध्यापक के. एल. पोंदा विद्यालय