राज्यात आजही पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या भागांमधील 21 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
पुढील महिनाभर मान्सून सक्रिय
भारतीय हवामान विभागाने (IMD) राजस्थानच्या काही भागांतून मान्सून माघारी घेतल्याचे जाहीर केले आहे. मुंबईतून मान्सून पूर्णपणे माघार घेण्यासाठी अजून एक महिना लागेल, कारण बंगालच्या उपसागरातून अनेक नवीन कमी दाबाचे पट्टे तयार होतील, ज्यामुळे पुढील महिनाभर मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासह पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली आणि सोलापूरला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय अहमदनगर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भाती अमरावती, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

















