महायुती सरकारची बहुचर्चित, महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही पहिल्या महिन्यापासूनच चर्चेत आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली, त्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील निकषात बसणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.
या योजनेचा सरकारला बराच फायदा झाला, विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळण्यातही या योजनेचा वाटा होता. मात्र विरोधकांनी या योजनेवरी बरीच टीका केली. त्यानंतरया योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अनेकांची नावंही समोर आली, त्यांना या योजनेतून आता वगळण्यात आलं आहे. .ा सर्व घटनांमुळे ही योजना सतत चर्चेत असते.
याचदरम्यान आता महायुतीमधीलच एका आमदाराने लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानामुळे नवी चर्चा रंगली आहे. ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे पण योजनेमुळे आदिवासींचं नुकसान झालं’ अशी प्रतिक्रिया महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने दिली आहे. शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी हे विधान केलं असून त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदिवासी विभागाचा निधि दिला जाऊ नये यासाठी पत्र दिलं आहे असंही पाडवी यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर बहिणींसाठी आमचे पैसे जात असतील अधिवेशनात विषय मांडू असं मोठं विधानही पाडवी यांनी केलं. त्यामुळे महायुतीमधल्या आमदाराचाच या योजनेला विरोध असल्याचे चित्र दिसत असून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले आमदार पाडवी ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे. गरीब महिलांना पैसे मिळावेत, हा सरकारचा उद्देश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली, आदिवासी महिलांनाही यातून पैसे मिळत होते.ती चांगली होष्ट होती. परंतु या योजनेमुळे आम्हाला दुःख आहे. कारण या योजनेसाठी आमचा निधी जात असेल तर आम्ही हा विषय अधिवेशनामध्ये मांडणार आहोत, असा इशारा पडवी यांनी दिला.
आमचे आदिवासींचे पैसे आम्हाला द्या, ही योजना चांगलीच आहे, पण आदिवासींचे पैसे आम्हाला द्यावेत, ते इतर योजनांसाठी देऊ नयेत, तिकडे वळवू नयेत अशी मागणी त्यांनी केली. ही योजना चांगली आहे, युती सरकार चांगली योजना राबवत आहे, पण आमचे पैसे का घेत आहेत ? सरकारने आमच्या योजनेचे पैसे इतरत्र वळवू नयेत. आमचे (आदिवासींचे) पैसे इतर योजनांसाठी वळवले जात असतील, तर त्यामुळे आदिवासींचं नुकसान आहे. यासंदर्भात आम्ही आदिवासी विकास मंत्र्यांनाही पत्रं लिहीलं आहे.
आमच्या आदिवासींचे पैसे योजनेसाठी वळवू नका, अशी विनंती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत. लाडकी बहीण योजना चांगली आहे, परंतु या योजनेसाठी दुसरा विभागाच्या निधी घ्यावा. आमच्या आदिवासी विभागाचे पैसे घेऊ नयेत, त्या निधीला हात लावू नका, अन्यथा त्यामुळे आदिवासीचं नुकसान होईल असं म्हणत मुख्यमंत्र्यांशीही या विषयावर बोलणार असल्याचं सांगत येत्या अधिवेशनातही हा विषय मांडणार असल्याचा पुनरुच्चार पाडवी यांनी केला.