पालघर-योगेश चांदेकर
देवीशी अनेक आख्यायिका जोडलेल्या
ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली देवी
पालघर: पांडव, मुगल काळाशी संबंध असलेल्या आणि आदिवासींची देवी म्हणून नावलौकिक असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढते आहे. अनेक आख्यायिका असलेल्या या देवीच्या भक्तांची संख्याही लाखोंत आहे. मंदिर दर्शन आणि पर्यटन अशा दोन्हींसाठी भाविक या ठिकाणी येत आहेत यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख तसेच शशिकांत ठाकूर व सदस्य यांनी भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत
गझनीच्या स्वारीनंतर डहाणूचे महालक्ष्मी मंदिर तोडण्यात आले. पुढे मुगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुढे पुन्हा मंदिरांची उभारणी करण्यात आली. या मंदिराबाबत पुराणात अनेक आख्यायिका आहेत. महालक्ष्मी देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असेही सांगितले जाते. देवीचे मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यापासून चार किलोमीटर असलेल्या विवळवेढे गावाजवळील गडावर आहे.
सहाशे फूट उंचावरील कायम जिवंत झरा
प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा आणि चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम केला जातो. वाघाडी येथील सातवी कुटुंबाला ध्वज लावण्याचा मान दिला आहे. ध्वज लावणारा व्यक्ती व्यसनांपासून दूर राहून ब्रम्हचर्याचे पालन करतो. देवीच्या गडावर फाल्गुन वद्य अष्टमीपासून चैत्र वद्य अष्टमीपर्यत पंधरा दिवस यात्रा-उत्सव भरविला जातो. विशेष म्हणजे, ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून सहाशे फूट उंचावर आहे. आश्चर्य म्हणजे या उंच ठिकाणावर पाण्याचा झरा आणि कुंड आहे. तेथील पाणी कधीच कमी होत नाही.
आदिवासी समाजाची जत्रा
डहाणूचे महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी १३०६ मध्ये केली होती. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून देवीवर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखों भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला, तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्रात चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो. या झेंड्याचा मान जव्हार संस्थानच्या मुकणे राजघराण्याचा असतो. हा झेंडा वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात.
भीमाने लग्न करण्याचा धरला होता आग्रह
प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून आली होती. त्या वेळी पांडव वनवासात होते. आई डहाणूला पोहोचली, तेव्हा खूप रात्र झाली होती. त्या वेळी तिला भीम भेटला. भीमाने भूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले, तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला. त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ‘तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल,’ असे देवी म्हणाली. भीम नदीवर धरण बांधू लागला. जेव्हा आईला आपत्ती येणार आहे, असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि ‘कुकडून कून’ असा आवाज केला. सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकारला आणि तेथून निघून गेला.
आदिवासी भक्त महिलेसाठी देवी खाली
रानशेतजवळील भुसाळ डोंगरातील एका गुहेत आई बसली. वेळ निघून गेली. मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले. एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली. डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले. ती बेशुद्ध पडली. आईला त्याचे वाईट वाटले. आई म्हणाली, आजपासून तू वर येऊ नकोस, आता मी खाली येते आहे. आई डोंगरावरून खाली येऊन विवळवेढे येथे स्थायिक झाली.
मुसा डोंगरावर दीड-दोनशे वर्षांपासून मंदिर
चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो. तो ध्वज वाघाडी गावचे पुजारी नारायण सातवा यांनी अर्पण केला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षसदैत्यांना त्रिशूळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे.
दोन मंदिरे
मातेचे एक मंदिर गडावर आहे, तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे. या गड पायथ्याशी महामार्गालगत असलेल्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर सुंदररित्या बांधले गेले आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे. तसेच या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचे मुख्य ठाणे दोन कड्यांच्या गुहेत आहे. ज्या भाविकांना अथवा पर्यंटकांना डोंगरावर चढून जावयाचे आहे, त्यांच्यासाठी चारेाटीपासून ६ किमी तर वरील वधना गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे. साधारणतः ९००पायऱ्या चढून जाव्या लागतात. गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरू होतो. देवीच्या डोंगरावरील स्थानावर जाण्यासाठी २००फूट भुयारातून जावे लागते. या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यांत असून देवीचा मुखवटा दर्शनी आहे. तो दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरून काढला आहे. मुखवट्याला सोने, चांदी अलंकारांनी सजवले असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय-विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा त्यांच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे.
राजे, महाराजे भक्त
अकबर बादशहाच्या वेळी राजा तोरडमल येथे आला होता. त्याने देवीचे दर्शन घेतले होते, अशी इतिहासांत नोंद आहे. तसेच, पंजाबचा राजा रणजित सिंह याने पंजाब सर केल्यावर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढवल्याची नोंद आहे.