पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या गडावरील मंदिराच्या सेवेसाठी गेली सात दशके आपले संपूर्ण आयुष्य तन, मन धनाने अर्पण करून, झोकून देऊन काम करणारे नारायण जावरे (वय ९२) यांचे निधन झाले. गेल्या सात दशकांचा महालक्ष्मी गडाच्या परिसराचा इतिहास काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण भाविकांत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची मुले रामदास,(झिपू दादा) परशुराम, रवी, श्याम, अशोक तसेच सुना आणि नातवंडे असा परिवार आहे
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षसदैत्यांना त्रिशूळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे.
श्रद्धास्थानाचे माहात्म्य वाढवण्यात योगदान
डहाणू नजीकचे गड किल्ल्यावर असलेले हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांचे हे श्रद्धास्थान होण्यात या भागातील पुजारी नारायण काका यांचे मोठे योगदान आहे. या ठिकाणी मातेची दोन मंदिरे आहेत. एक गडावरचे आणि दुसरे पायथ्याशी. डोंगरावर देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर आता सुंदर रित्या बांधले असून त्यात मोठे योगदान नारायण जावरे यांचे आहे.
अध्यात्माचा इतिहास पडद्याआड
महालक्ष्मी गड व परिसरात त्यांची ओळख नारायण काका अशीच होती. गडाच्या पुनर्बांधणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अहोरात्र महालक्ष्मीच्या सेवेसाठी निस्वार्थपणे झोकून देऊन काम करणाऱ्या नारायण काकांच्या निधनामुळे या भागातील अध्यात्माचा एक चालता बोलता वारसा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
निगर्वीपण
अतिशय निगर्वीपणाने काम केल्यामुळे नारायण काका हे या परिसरातील सर्वच स्वयंसेवी संस्था, राजकीय मंडळी परिसरातील विविध मंदिरांच्या विश्वस्तांत एक प्रतिमा होती. त्याच्या निधनाने या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नारायण काकांच्या अंत्यविधीसाठी सर्वांनी हजेरी लावली. आपल्या कुटुंबातील जणू एक मोठा आधारस्तंभ कोसळल्याची भावना या वेळी सर्वांच्या मनात होती. नारायण काकांना दुःख भरल्या अंतकरणाने सर्वांनी निरोप दिला.