आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीमधील तीनही मोठे आणि महत्त्वाचे घटक पक्षदेखील कामाला लागले आहेत.
राज्यात महायुतीचं सरकार आहे. पण स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकत्र निवडणूक लढणार की स्वतंत्र? याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“भाजपमध्ये अशाप्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमची निवडणूक कमिटी यांना आहे. बाकी कुणालाही याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आम्ही महायुतीत निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढतहोतील”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
राज्यभरातील सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू. एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रिपूर्ण निवडणूक लढू. संभ्रम नको, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील स्पष्ट केलं आहे.
“महाराष्ट्रात संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे. शंभर टक्के सोबत लढणार आहे. आम्ही असेच आदेश आमच्या पक्षाला दिले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनादेखील तसे आदेश दिले आहेत. त्यांचं स्थानिक पातळीवर बोलणं सुरु झालेलं आहे. फारच वाद उत्पन्न झाला तर एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. बाकी सरसकट महायुती आहे. कुठलाही संभ्रम बाळगायची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. “येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, त्यामध्ये शक्य तिथे जरुर युती करु. पण शक्य नसेल तिथे आपण आपल्या ताकदीवर लढायचं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.