महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे खासगीरीत्या 17 नंबर अर्ज भरून दहावी आणि बारावी परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी राज्य मंडळाने मुदतवाढ दिली आहे.
संबंधित विद्यार्थ्यांना आता 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी देण्यात आलेली मुदत 31 ऑगस्ट रोजी संपुष्टात येण्यापूर्वीच शिक्षण मंडळाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
17 नंबरचा अर्ज भरून विद्यार्थ्यांना थेट दहावी किंवा बारावीची परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दहावी आणि बारावीसाठी नोंदणी शुल्क 1 हजार 110 रुपये, प्रक्रिया शुल्क 100 रुपये तसेच विलंब शुल्क 100 रुपये आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व नियमित शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंटआउट, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआउट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत किवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत 15 सप्टेंबर आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या http:/// www. mahahsscboard. in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.