शेकाप नेते जयंत पाटील यांच्याच घरात मोठी फूट पडली आहे. त्यांचे बंधू व अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षानं तिकीट नाकारल्यानं पंडित पाटील नाराज होते.
त्यामुळे त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटलांना मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुंबईत जाऊन ते भाजपाचं कमळ हाती घेणार आहेत. यामुळे शेकापमधील कुटुंबकलह समोर आला आहे. पंढरपूरमधील पक्षाच्या अधिवेशनात पहिली ठिणगी पडली. त्यानंतर विधानसभा निवडणूकीपासून शेकापच्या पाटील कुटुंबातील वाद चव्हाटयावर आले.
आता कुटुंबातच फूट पडल्यानं शेकापसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र, शेकापने यापूर्वी असे अनेक धक्के पचवत पुन्हा उभारी घेतली आहे. त्यामुळे शेकाप कधीही संपणार नाही असा दावा पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला आहे,
एकेकाळी राज्यात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शेकापकडे पाहिलं जात होतं. त्यानंतर पक्षाला हळूहळू उतरती कळा लागली.
- रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता
- अनेक वर्षे रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचा लाल बावटा डौलानं फडकत होता
- राज्यात केवळ सांगोल्यात शेकापचा एकमेव आमदार आहे
- मागील दोन निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातून शेकापचा एकही आमदार निवडून आला नाही
- माजी आमदार विवेक पाटील भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात आहेत
- महाविकास आघाडीतील वादामुळे जयंत पाटलांना यावेळी विधान परिषदेची पायरी चढता आली नाही.
एकेकाळी केवळ रायगडच नव्हे तर राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची सध्याची वाटचाल पक्षावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे. त्यातच आता कुटुंबातच फूट पडल्यानं याचे राजकीय पडसाद उमटणार हे निश्चित आहे.