स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषतः महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता, पुणे महापालिकेच्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून सोमवारी दुपारनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून, या कार्यक्रमाची वेळ दुपारी 2 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात हा उपक्रम भाजपच्या पुढाकारातून होत असल्याचे बोलले जात आहे. सांगली आणि सातारा येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पुण्यात दाखल होणार असून, हडपसर येथील कार्यक्रमानंतर ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महापालिकेच्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून सुमारे 35 दिवसांचा अत्यंत शिस्तबद्ध निवडणूक कार्यक्रम राबवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या घोषणा आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी 23 जानेवारीपासून सुरू होत असल्याने, त्यापूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर व्हावेत, यासाठी सरकार आग्रही असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 48 ते 72 तासांत महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भाजपने निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही चित्र दिसत आहे.
















