banner 728x90

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

banner 468x60

Share This:

ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याच्या या यशात महावितरणची ८५.८५ लाख स्मार्ट मीटरसह प्रमुख कामगिरी आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जा परिवर्तन चालू आहे. सौर कृषी पंप बसविण्यासह विविध बाबतीत महाराष्ट्राने देशात ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आता स्मार्ट मीटर बसविण्यातही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. शंभर टक्के अचूक बिल, ग्राहकांना दर तासाला मोबाईलवर विजेचा वापर समजण्याची सुविधा, सवलतीच्या वीजदराच्या काळात अधिक वीजवापराची उपकरणे वापरण्याचे नियोजन करणे व विजेचा वापर नियंत्रणात ठेवण्याची संधी असे अनेक लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसविण्यात येत आहेत.

स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रती युनिट ८० पैसे टीओडी सवलतही देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी वीजदरात सवलत देण्यात येत आहे. राज्यात ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य देशात पहिला

स्मार्ट मीटर बसवण्याच्या बाबतीत १० फेब्रुवारीपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार ८७.५७ लाख स्मार्ट मीटरसह महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, बिहार (८६.४४ लाख) व उत्तर प्रदेश (८२.७५ लाख) ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

स्मार्ट मीटरमुळे वीजदरवाढीचा गैरसमज

स्मार्ट मीटरमुळे वीजदरात वाढ होईल, असाही एक गैरसमज निर्माण झाला होता. मात्र, राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात केल्यानंतर महावितरणने पंचवार्षिक वीजदर निश्चितीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत वीजदर कमी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्मार्ट मीटर मोफत मिळण्यासोबतच त्याचा अप्रत्यक्ष बोजाही पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!