पालघर: पापलेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. मात्र पालघरमध्ये राज्य मासा संकटात असल्याचे समोर आले आहे.
मत्स्यव्यवसायाने आता या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पालघरच्या समुद्रात पापलेट मोठ्या प्रमाणात सापडतात. चंदेरी पापलेट म्हणजेच सिल्व्हर पॉम्फ्रेट हा पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर आढळतो. पापलेटच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र या सगळ्यात चंदेरी पापलेटला अधिक मागणी असते. खवय्यांकडूनही सर्वाधीक पसंती असते. त्याचबरोबर या माशाची परदेशातही निर्यात केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. याच विचार करुन राज्य शासनाने चंदेरी पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे.
पालघर जिल्ह्यात पापलेट माशाच्या लहान पिल्लांची कत्तल होत असल्याचे समोर आलं आहे. माशांच्या छोट्या पिल्लांची होणारी ही कत्तल वेळीच थांबली नाही तर राज्य मासा असलेल्या पापलेटचे अस्तित्व संकटात सापडणार आहे. पापलेट माशांच्या घटत्या संख्येंची आकडेवारी चिंताजनक आहे. सातपाटी येथे 2023 मध्ये 107 टन पापलेट सापडला होता. पण 2024 मध्ये फक्त 63 टन पापलेट मासा सापडला होता.
लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याती गरज मच्छमार बांधवांनी केली आहे. राज्य शासनाने माशांच्या छोट्या पिल्लांच्या मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी सीएमएपआरआय या विभागाने पापलेटसह 58 माशांच्या किमान कायदेशीर आकारमानांची शिफारस केली आहे.
विविध कारणांमुळं मासा संकटात
वादळे, सागरी पर्यावरणीय समस्या, सागरी प्रदूषण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माशांच्या पिल्लांची होणारी कत्तल यामुळं सिल्व्हर पापलेटचे प्रमाण कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील या पापलेटची मागणी आहे. गेल्या काही दशकांमध्ये केवळ या पापलेटचे उत्पादन दवळपास 50 टक्क्यांनी कमी झाले आहे.
मच्छमारांच्या जाळ्यात चंदेरी पापलेट सापडणे ही त्यांच्यासाठी लॉटरीच असते. कोकणातील सर्वच किनारपट्टीवर हा मासा आढळतो. मात्र पालघरच्या सातपाटीत या माशांचे प्रमाण मुबलक आहे. पापलेट मासा लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे त्याची चव. हा मासा शिजवल्यानंतर त्याची चव मऊ होते. त्यामुळं हा मासा खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.