आज आपल्यासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान असताना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग असून, क्वांटम कम्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रांत उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल.
महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल असून, राज्याकडे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न एमकेसीएलने करायला हवा. शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्यमहोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, एमकेसीएलचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. विवेक सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असल्याने शासनाने कृषी क्षेत्रात त्याचा वापर करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नावीन्यता शहर स्थापित करण्यात येणार आहे. नव्या पिढीला उत्तम शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पाच परदेशी नामवंत विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केला असून, एमकेसीएलने अधिक व्यापक दृष्टिकोनातून जनतेचे जीवन ज्ञानसमृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी.
ॲड. शेलार म्हणाले, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ हा शासनासाठी अभिमानाचा विषय आहे. २ कोटी प्रशिक्षणार्थींना संस्थेने माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले असून, एमकेसीएलने डिजिटल साक्षरतेचा प्रसार केला.डॉ. काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उलाढाल होत असताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून समाजपरिवर्तन करणे शक्य असल्याचे एमकेसीएलने दाखवून दिले आहे.