बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दितवा चक्रीवादळाचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. महाराष्ट्रही यातून सुटलेला नाही. राज्यात थंडीचा तडाखा स्पष्टपणे वाढला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे.
या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मुसळधार पावसाने कहर केला असून आता भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कारईकल आणि तेलंगणा या राज्यांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये वाऱ्यांचा वेग वाढला असून तापमानात घट दिसून येत आहे. त्याच परिणामाची झळ महाराष्ट्रालाही बसत आहे आणि पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत पारा घसरला
दितवा चक्रीवादळामुळे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत आहे. मुंबईतही गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून येत्या दिवसांत गारठा अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी मुंबईत सकाळी कमाल तापमान 31.8 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 21.7 अंश सेल्सियस इतके होते. नेहमीपेक्षा तब्बल 1.4 अंश सेल्सियसने तापमान घटल्याचेही हवामान विभागाने नोंदवले आहे.
श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे उत्तरेकडील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत 70 ते 80 किमी प्रतितास वेगाचे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवेल आणि राज्यातील थंडीचे प्रमाण आणखी वाढेल.
या भागांना सर्वाधिक फटका
हवामान विभागाने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात राज्यात तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे. याचा सर्वाधिक परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यांतही दितवा चक्रीवादळाचा फटका जाणवणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढू शकते. अद्याप कुठेही पावसाची नोंद झालेली नसली तरी या चक्रीवादळामुळे काही भागांत पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये दरवर्षी साधारण 4-5 दिवस टिकणारी थंडीची लाट यंदा 10 दिवसांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
















