राज्यात ८ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात आजही पाऊस पडण्याची शक्यता असून सध्या राज्यात ढगाळ वातावरण आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोकणात रायगड, रत्नागिरी, विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशीव या ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वरील जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
कुठे कुठे पडला पाऊस अन् कसे होते तापमान
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः कोकण व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.
विदर्भात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली.
प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसनुसार)
मुंबई (कुलाबा) ३४.१, सांताक्रूझ ३४.०, अलिबाग ३५.४. रत्नागिरी ३४.५, पणजी (गोवा) ३५.७. डहाणू ३५.८, पुणे ३७.२, लोहगाव ३९.८, अहिल्यानगर, जळगाव ३७.८. कोल्हापूर ३६.५. महाबळेश्वर ३०.७, मालेगाव ३९.२, नाशिक ३५.३, सांगली ३७.४. सातारा ३७.२, सोलापूर ४०.२. धाराशिव ४०.०, छत्रपती संभाजीनगर ३६.५, परभणी ३८.०, नांदेड बीड अकोला ४०.३, अमरावती ३८.४. बुलढाणा ३७.०, ग्रहापुरी ४०.०, चंद्रपूर ३९.०, गोंदिया ३६.६, नागपूर ३९.०, वाशिम ३९.५, वर्धा ३८.५. यवतमाळ ३९.४.
भारतात काय आहे स्थिती
भारतीय हवामान विभागाने (IMD) ८ मे २०२५ साठी संपूर्ण देशासाठी सविस्तर हवामान अंदाज जारी केला आहे, ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या हवामान धोक्यांचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी, हवामान खात्याने भारतातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या परिणामाबद्दल इशारा दिला असला तरी, ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवला आहे.