पालघर-योगेश चांदेकर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर
शिवसेनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी
पालघरः पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटात अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मोकळा झाल्याने आता नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत. त्यात पक्षाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा मोठा वाटा आहे.
पालघर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला महायुतीला चांगले यश मिळाले. त्यात राज्य पातळीवरील नेत्यांचा जसा सहभाग होता, तसाच सहभाग स्थानिक पातळीवर कुंदन संखे यांचाही होता. अन्य मित्र पक्षाशी ठेवलेल्या संपर्कातून त्यांनी महायुतील अन्य पक्षांशी अतिशय चांगला संपर्क ठेवला. त्याचबरोबर राज्यातले शिवसेनेचे अहोरात्र सुरू असणारे एकमेव कार्यालय पालघरमध्ये सुरू करून त्यातून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न संखे यांनी केला.
नव्याने ताकद वाढीवर भर
आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने शिंदे गटाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि जिल्ह्यातील दोन आमदारांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेशाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीवर भर दिला. आमदार राजेंद्र गावित व विलास तरे यांनी आमदार आपल्या दारी या माध्यमातून जनतेचे प्रलंबित प्रश्न जागीच सोडवण्यावर भर दिला. संखे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध राजकीय पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना शिवसेनेत सामील करून घेण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या भूमिकेला यश मिळाले असून मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या नेत्यांचा प्रवेश
माजी आमदार अमित घोडा, डहाणू विधानसभेचे मनसेचे उपजिल्हाप्रमुख विपुल पटेल, आगवन ग्रामपंचायत सरपंच रुपजी कोल, मच्छीमार समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेले कुंदन दवणे, दांडी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, रिक्षाचालक संघटनेचे संदीप पाटील, जगदीश ठाकूर, उत्तर भारतीय समाजाचे राजू शर्मा, डहाणू तालुक्यातील काँग्रेसचे जितू पटेल, डहाणूच्या मनसेच्या महिला शहराध्यक्ष शोभा खताळ आदींनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेनेचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित, बोईसरचे आमदार विलास तरे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह संपर्कप्रमुख केदार काळे, उपनेत्या ज्योती मेहेर, उपनेते जगदीश धोडी, जिल्हा संघटक वैदेही वाढाण, डहाणू शहर प्रमुख रमेश पाटील, विभाग प्रमुख अजित बारी, डहाणू युवासेना समन्वयक मिलिंद बारी आदी उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांचे प्रयत्न आणि पक्षप्रवेशासाठी गर्दी
डहाणू विधानसभेचे संघटक डॉ. आदित्य अहिरे, उपजिल्हाप्रमुख समीर सागर, डहाणू तालुकाप्रमुख हेमंत धर्ममेहेर आदींच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत आले. त्यात आगवन ग्रामपंचायतच्या आठ सदस्यांचा समावेश असून उपसरपंच निकिता माच्छी, तसेच जनता बँकेचे माजी संचालक संजय धोडी, आशागड ग्रामपंचायतचे सदस्य जितू पटेल, उत्तर भारतीय छटपूजा अध्यक्ष ओमप्रकाश रावत, चरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास सपाटे, हिंदू जनजागृती संघटनेचे अध्यक्ष परेश भरवाड, मालू भरवाड, विनोद घोश्या, सुजीत अहिर, गणपत उमतोल, अकबर खान काशिनाथ माच्छी आदींचा समावेश आहे.
कोट
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांसह अन्य संस्थांवर भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर आहे. शिवसेनेचे नेतृत्व सर्वसमावेशक असून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल, याबाबत मनात कोणतीही शंका नाही.
कुंदन संखे, शिवसेना जिल्हाप्रमुख, पालघर